सांगली : पंश्चिम बंगाल, आसाम, पाँडेचरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सांगली व मिरज शहरात भाजप कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटून, फटाक्याची आताषबाजी करत जल्लोष साजरा केला. या अभूतपूर्व यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्व असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तर भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन करताना माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला हा विजय प्रचंड मेहनतीने मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
तृणमूल काँग्रेसची गेल्या दहा वर्षातील पश्चिम बंगालमधील सत्ता बाजूला करत भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. यामागे पंतप्रधान मोदी यांचे विकासाचा दृष्टीकोन आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय कौशल्याचा परिपाक असल्याची प्रतिक्रिया आ. डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केली.मिरजेत आ. खाडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी आ. खाडे यांच्यासह नगरसेवक मोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच्या विजयाबद्दल सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालीयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांच्या विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या. फटाक्यांची आताषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी पेढे आणि साखर वाटप करण्यात आले.
दरम्यान, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन करत असताना प्रचंड मेहनत घेउन हा विजय संपादन केल्याचे म्हटले. प्रथमदर्शनी भाजपचा विजय झाला असून पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये एनडीएचे घटक पक्ष असलेल्यांचा पराभव का झाला याचे विश्लेषण केले जाईलच, तेथील स्थानिक परिस्थिती काय आहे याची माहिती नसल्याने यावर अधिक भाष्य करता येणार नाही असेही त्यांनी सांगितले.
