scorecardresearch

बेळगावसह सीमा भागात काळा दिन; लढा सुरू ठेवण्याचा निर्धार

मराठी भाषकांनी आज बेळगावात निषेध फेरीला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने रेवजी मराठा मंदिर येथे निषेध सभा आयोजित केली होती.

बेळगावसह सीमा भागात काळा दिन; लढा सुरू ठेवण्याचा निर्धार
बेळगावात काळा दिनानिमित्त झालेल्या निषेध सभेला मराठी भाषकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर : बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधवांनी सोमवारी काळा दिन पाळला. बेळगावात निषेध सभा घेऊन सीमाप्रश्नाचा लढा सुरू ठेवण्याचा इरादा व्यक्त करण्यात आला.

 भाषावार प्रांत रचनेत बेळगावसह मराठी भाषकांचा प्रदेश कर्नाटकात समविष्ट करण्यात आला. याच्या निषेधार्थ मराठी भाषक काळा दिन पाळत असतात. यानिमित्त मूक मोर्चाचे आयोजन केले जाते. करोना संसर्गामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाने निषेध मोर्चाला खो घातला.

मराठी भाषकांनी आज बेळगावात निषेध फेरीला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने रेवजी मराठा मंदिर येथे निषेध सभा आयोजित केली होती. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी कर्नाटक पोलिसांनी दडपशाही सुरू केली होती. मराठा मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या भागात येणाऱ्या कार्यकत्र्यांची अडवणूक केली जात होती. अगदी रुग्णवाहिका अडवून चौकशी केली जात होती. तरीही मोठ्या संख्येने मराठी बांधव सभेसाठी दाखल झाले. बेळगावसह खानापूर, निपाणी आदी भागातही निषेध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सहा दशकांहून अधिक काळ सीमाभागातील मराठी माणूस मराठी भाषेत लढा देत आहेत. तो दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. दबाव झुगारून संघर्ष सुरूच ठेवू, असा निर्धार युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी व्यक्त केले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह अनेक वक्त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाप्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष सीमाभागात येऊन आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे. हा प्रश्न सीमावासियांचा नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, अशा शब्दात त्यांनी जाणीव करून दिली.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या