Minister Shambhuraj Desai On BJP: नुकत्याच लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालावरुन राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ‘अति तिथे माती होत असते’, असे देसाई म्हणाले. ‘दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार आणि अजित पवार गट) आणि शिवसेना यांना मिळालेल्या जागा आणि भाजपाला मिळालेल्या जागा यांची बेरीज करुन बघा. माणसं योग्य वेळ आणि संधीची वाट बघत असतात’, असे मंत्री देसाई म्हणाले. मरळी, पाटण येथे काढण्यात आलेल्या विजयी सभेला मंत्री शंभूराज देसाई संबोधित करत होते.

अति तिथे माती होते – मंत्री देसाई

“पाटणमध्ये मोठे नेते, मंत्र्यांनी येऊन भाषणं केली. पण, जिल्हा परिषदेचा निकाल तपासून बघा. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपा यांची बेरीज काय होते बघा. अति तिथे माती होते, अति केलं तर माणसं योग्य वेळ, संधीची वाट बघत असतात”, असे मंत्री शंभूराज देसाई विजयी रॅलीला संबोधित करताना म्हणाले. ‘गणेश नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने इथं येऊन टांगा पलटी वगैरे सारखं भाष्य करणं योग्य नव्हते’, असेही देसाई म्हणाले.

सत्यजित पाटणकरांनी भाजपात प्रवेश का केला?

“सत्यजित पाटणकरांचा २०२४ विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. यानंतर त्यांना काहीतरी आधार मिळेल म्हणून भाजपात प्रवेश केला. काही जणांना घोषणा केली तसे पॅकेजही मिळेल”, असे देसाई म्हणाले. “मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी तालुक्यात येऊन इथले पालकमंत्री सत्यजित आहेत असे वक्तव्य केलं. पालकमंत्री सोडा जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत एक जागा कशीतरी निवडून आली अन्यथा ती देखील आली नसती”, असा टोला मंत्री देसाईंनी लगावला.

साखर नव्हे गुळ पावडरचा कारखाना

‘सत्यजित पाटणकरांनी सुरु केलेला कारखाना साखर नव्हे गुळ पावडरचा कारखाना आहे’, असा टोला मंत्री देसाई यांनी लगावला. ‘बाजारात मरळी कारखान्याची साखर मिळते पण, पाटण अॅग्रोची साखर कुठे मिळते ते दाखवावे’, असेही देसाई म्हणाले. तालुक्यात मोठ्या संस्था आणि विकासकामे करण्याचे काम दिवंगत बाळासाहेब देसाईंनी केल्याचेही मंत्री देसाई म्हणाले. यावेळी देसाई यांनी कोयना धरण, ढेबेवाडी घाट आणि जळव घाटातून रस्ता करणे, मरळी कारखाना इ. उदाहरणं दिली.

उमेदवारी देण्यासाठी पाच दिवस कोर कमिटीची बैठक

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी सलग पाच दिवस कोर कमिटीची बैठक घेतली जात होती. साहेब सर्व निर्णय घेतात असं नाही. तालुका कोर कमिटीमधील नऊ लोकांनी बैठकीअंती उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, असेही देसाईंनी यावेळी सांगितले.