कोल्हापूर :राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुपुत्रांना देण्यात येणारा यंदाचा ब्रँड कोल्हापूर पुरस्कार अंतर्गत कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक रोडमराठाकार डॉ.वसंतराव मोरे आणि ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्य दिग्दर्शक डॉ शरद भुथाडिया यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण उद्या बुधवारी सकाळी १० वाजता येथे करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते व विधानपरिषदेचे कॉँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.
या वर्षीचा ब्रँड त्यांच्यासह कला, क्रीडा,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश मिळविलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंतांचा ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ७ वे असून तो निमंत्रितांसाठी आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूरच्या अनेक सुपत्रांनी कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवून कोल्हापूरचा नावलौकिक जागतिक पातळीवर केला आहे. नव्या पिढीनेही ही परंपरा जपली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील या सुपुत्रांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली’ब्रँड कोल्हापूर’ हा सन्मान देण्याचा उपक्रम सुरु आहे.
दिवाळीच्या सणादरम्यान सर्व मान्यवर हे आपल्या घरी असतात, त्यामुळे त्यादरम्यान हा उपक्रम घेतला जातो. विशेष म्हणजे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी वरीष्ठ पातळीवर काम केलेले कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र असणारे आजी-माजी अधिकारी यांना पाहुणे म्हणून निमंत्रित केले जाते. आजपर्यंत डॉ. ज्ञानेश्वर मुळे, भूषण गगराणी, विकास खारगे, हेमंत निंबाळकर, सुनिल लिमये,डॉ. यशवंतराव थोरात हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले होते. या वर्षीचा पुरस्कार वितरण समारंभ पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य उदय गायकवाड, प्राचार्य डॉ. महादेव नरके, प्राचार्य अजेय दळवी, चेतन चव्हाण, अनंत खासबारदार, भरत दैनी, डॉ. अमर आडके, अनुराधा कदम, विनायक पाचलग, संग्राम भालकर, ऐश्वर्य मालगावे, डॉ. राजेंद्र रायकर, सचिन लोंढे-पाटील यांनी ही माहिती दिली.
