कोल्हापूर : गतवर्षी पेक्षा दुप्पट म्हणजे १० हजार कोटी आर्थिक तरतुदीच्या बरोबरीने वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी पाच उपभागासह एकात्मिक कार्यक्रम, विणकर कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग राष्ट्रीय हातमाग,हस्तकला कार्यक्रम, राष्ट्रीय धागा धोरण, टेक्स्ट इको युनिव्हर्सिटी सुरू करणे आदी घोषणांमुळे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे वस्त्रोद्योगातून स्वागत करण्यात येत आहे. अमेरिकेच्या कर धोरणामुळे अडचणीत आलेल्या देशातील वस्त्रोद्योगाला या उपाययोजनांमुळे उभारी मिळून निर्यातीचे द्वार प्रशस्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशातील वस्त्रोद्योग देशविदेशात घडणाऱ्या घडामोडीमुळे अडचणींचा सामना करीत आहे. त्याला उत्तेजन देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी देशभरातील वस्त्रोद्योग संघटनानांनी केंद्र सरकारकडे गेल्या काही महैनयनापासून लावून धरली होती. त्यांच्या या पाठपुराव्याची उचित दखल यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतल्याचे दिसते. गत वर्षी वस्त्रोद्योग कार्यक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सुमारे साडे पाच हजार कोटींची तरतूद केली होती. ती यंदा १० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यातून निर्यात आणि रोजगार निर्मितीला चालना मिळण्यास मदत होईल.

पाच फलदायी योजना

वस्त्रोद्योगात गुंतवणूक वाढावी यासाठी ५ एफ धोरण राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कापूस ते धागा , धागा ते कारखाना, कारखाना ते फॅशन, फॅशन ते विदेश, विदेशात बाजारपेठ असा या पाच उप-भागांतर्गत एकात्मिक कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कृषी उत्पादनापासून आंतरराष्ट्रीय विक्रीपर्यंतचे पाच टप्पे समाविष्ट असून कच्च्या मालाच्या उत्पादनापासून ते जागतिक निर्यातीपर्यंत संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळी मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सर्व घटकांचा विचार

रेशीम, लोकर आणि ताग, मानवनिर्मित तंतू आणि नवीन काळातील तंतू यासारख्या नैसर्गिक तंतूंमध्ये स्वावलंबी होण्यासाठी ‘राष्ट्रीय धागा योजना’ जाहीर करण्यात आली आहे. खेरीज, मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याने वस्त्रोद्योग बगिच्यात वाढ होण्यास मदत होईल. ग्रामीण भागात रुजलेल्या राष्ट्रीय हातमाग आणि हस्तकलांना महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रमाच्या एकात्मिक प्रणालीमध्ये एकत्रित करण्याची योजना सादर करण्यात आली असल्याने विणकर, कारागिरांना मदत होणार आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, शाश्वत कापड, वस्त्रांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘टेक्स-इको इनिशिएटिव्ह’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

विकेंद्रित क्षेत्राकडे दुर्लक्ष

वस्त्रोद्योग विस्तार व रोजगार योजनेअंतर्गत क्लस्टर आधुनिकीकरण, तंत्रज्ञान सुधारणा आणि सामायिक चाचणी सुविधांमुळे उत्पादनक्षमता वाढून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. टेक्स्ट-इकॉनसारख्या नाविन्यपूर्ण व शाश्वत उपक्रमांमुळे वस्त्रोद्योग भविष्यासाठी सज्ज होईल, असे मत व्यक्त करताना राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी त्याचबरोबर विकेंद्रीत यंत्रमाग, सूतगिरण्या,साईजिंग, प्रोसेस व गारमेंट हाऊस यांच्यासाठीही सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.

आधुनिकीकरणाच्या मार्गावर

वस्त्रोद्योगाला पंचसुत्री कार्यक्रम जाहीर केल्यानेवस्त्रोद्योग वाढीला व निर्यातीला चालना मिळणार आहे. विस्तार योजना उद्योजकांना आधुनिकीकरणाच्या मार्गावर नेण्यास मदत मिळणार असल्याने अर्थसंकल्पाचे स्वागत करीत आहे, असे इचलकरंजी पाॅवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.