कोल्हापूर : केंद्र सरकारने गुरुवारी साखर निर्यात करण्यासाठी २० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याप्रश्नी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यंदा देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आगामी गळीत हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. साखर कारखानदारांनी साखर निर्यातीचा निर्णय घेऊन, कच्ची साखर बंदरांवर पोचवली. मात्र केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे हजारो क्विंटल साखर बंदरांवर पडून आहे.

 यातून मार्ग काढण्यासाठी साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्याकडेे केली होती. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेले निर्बंध २० जुलैपर्यंत हटवण्याचा निर्णय घेतला असून पुढील १५ दिवसात साखर निर्यात करायला परवानगी देण्यात आली असल्याने साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडिक यांनी पहिलीच मागणी केंद्र सरकारकडून मान्य झाली आहे.