सांगली : अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नाही तर दुरूस्तीला परवानगी दिली असल्याचे केंद्रिय जल आयोगाने पाठविलेल्या पत्रात म्हटले असल्याचे अॅड. विश्राम कदम यांनी सांगितले. अलमट्टीला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यताही देण्यात आली नसल्याचा खुलासाही या पत्रात करण्यात आला आहे.
अॅड. कदम यांनी केंद्रिय जल आयोगाकडे पत्र पाठवुन कर्नाटकातील अलमट्टी धरणाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे का आणि उंची वाढीसाठी परवानगी देण्यात आली आहे अशी विचारणा केली होती. यावर केंद्रिय जलआयोगाने २६ जानेवारी रोजी कदम यांना पत्र पाठवून याबाबतची वस्तुस्थिती कथन केली असल्याचे कदम यांनी सांगितले.
यानुसार अलमट्टी धरणाची सध्याची उंची ५१९.६० मीटर आहे. ही उंची ५२४.२६ मीटर केली तर १३० टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा होउ शकतो. यामुळे अप्पर कृष्णा खोर्यातील सिंंचनाचा प्रश्न सुटू शकतो असे कर्नाटकने कळविले होते. मात्र, सद्य स्थितीत अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ भौतिक दुरूस्तीसाठी केंद्रिय जल आयोगाने परवानगी दिली असल्याचे अॅड. कदम यांनी सांगितले. अलमट्टीसाठी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळावी अशी कर्नाटककडून मागणी करण्यात आली होती. मात्र, आवश्यक पूर्तता न झाल्याने अशी मान्यता देण्यात आलेली नसल्याचा खुलासाही जलआयोगाकडून करण्यात आला असल्याचे कदम यांनी सांगितले.

