बेळगाव महापालिकेत मराठी उमेदवारांसमोर आव्हान

५८ सदस्यीय बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत ३८५ उमेदवार रिंगणात आहेत, तर सुमारे सव्वाचार लाख मतदार आहेत.

|| दयानंद लिपारे
मराठीबहुल प्रभागांची रचना बदलली; उद्या मतदान
कोल्हापूर : बेळगाव महापालिकेच्या शुक्र वारी होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा भगवा झेंडा फडकवण्यासाठी मराठी भाषकांनी कंबर कसली आहे. भाजप, काँग्रेस, जनता दल, एमआयएम या पक्षांनी प्रथमच रिंगणात उडी घेतल्याने संघर्ष जोरदार होणार आहे, तरीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी उमेदवारांची प्रचाराची तोफ धडाडत आहे. ३ सप्टेंबरला ही निवडणूक होत आहे.

५८ सदस्यीय बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत ३८५ उमेदवार रिंगणात आहेत, तर सुमारे सव्वाचार लाख मतदार आहेत. अलीकडेच झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके  यांना सुमारे सव्वा लाख मते मिळाली. यावरून एकीकरण समितीचे अद्यापही प्राबल्य असल्याचे स्पष्ट झाले. महापालिका निवडणुकीत एकीकरण समितीपुढे आव्हान असेल.

सीमालढ्याचे बेळगाव हे प्रमुख केंद्र राहिले. बेळगाव महापालिकेत सुरुवातीपासूनच मराठी भाषक नगरसेवकांचे वर्चस्व राहिले. १९७६ साली बेळगाव महापालिकेची स्थापना झाली. पुढे आठ वर्षे प्रशासक कारकीर्द होती. १९८४ साली पहिली निवडणूक झाली. तेव्हापासून ते आताच्या विद्यमान बाराव्या सभागृहात एकीकरण समितीचे बहुतेक महापौर झाले. लोकसभा निवडणुकीला एकीकरण समितीचे शुभम शेळके यांनी सव्वा लाख मते घेतल्याने मराठी भाषकांची ताकद दिसून आली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात उमेदवारीसाठी चढाओढ दिसून आली. त्यावर एकीकरण समितीने प्रभागातील पंचांना उमेदवारीचे अधिकार दिले. त्यातून २३ अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. अन्य प्रभागांमध्ये मराठी भाषक उमेदवारांना निवडणूक लढवण्याची मुभा दिली आहे. त्यांनी निवडून आल्यानंतर समितीच्या झेंड्याखाली काम करायचे ठरवले आहे.

राजकीय खेळी

आजवर केवळ सहा वेळा कन्नड भाषक महापौर झाले. या वेळच्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. तेव्हा मराठी भाषक बहुसंख्य असलेले प्रभाग जाणीवपूर्वक फोडले गेले. कन्नड व उर्दू भाषकांचा फायदा पाहणारे प्रभाग जोडले गेले. शिवाय बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात दक्षिण व उत्तर हे दोन विधानसभा मतदारसंघ हद्दीत येतात. परंतु, बेळगाव ग्रामीण व व यमकनमर्डी येथील काही भाग बेळगावशी जोडला असल्याचे दाखवून तेथील लोकप्रतिनिधींनाही मतदानाचा अधिकार अबाधित ठेवून मराठी भाषकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

 राष्ट्रीय पक्ष आखाड्यात

यापूर्वी बेळगाव महापालिकेमध्ये प्रामुख्याने निवडणूक होत असे ती मराठी भाषक विरुद्ध उर्दू – कन्नड भाषक यांच्यामध्ये. अलीकडे बेळगाव जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असल्याने त्यांनी महापालिका निवडणूक सर्व प्रभागात पक्ष चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल, एमआयएम या राष्ट्रीय पक्षांनी चिन्हावर आखाड्यात उडी घेतली आहे. भाजपचा वाढता प्रभाव रोखण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या मदतीचा हात हा कोणाकडे जाणार यावर मराठी भाषक उमेदवारांचे यश अवलंबून आहे.

मराठी अस्मितेला जाग

अर्थात केवळ कॉंग्रेसच्या मदतीवर नव्हे तर स्वबळावर निवडून येण्याची तयारी मराठी उमेदवारांनी केलेली आहे. बेळगाव महापालिकेसमोर अनधिकृत लावण्यात आलेला लाल पिवळा झेंडा, शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीला अलीकडे झालेला विरोध यामुळे मराठी भाषकांच्या अस्मितेला डिवचण्याचे कन्नड धार्जिणे धोरण कायम राहिले आहे. यामुळेच मराठी भाषकांची एकजूट आणखी पक्की झाली आहे. याचा फायदा मिळवण्याच्या दृष्टीने बांधणी सुरू आहे. ‘महापालिका निवडणुकीत मराठी माणसांना फटका बसवावा असे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे. करोना संसर्ग असतानाही ऐनवेळी निवडणूक जाहीर केली आहे. बेळगाव महापालिकेतील मराठी भाषकांचे वर्चस्व कमी व्हावे यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येत आहेत. उमेदवारी अर्ज मराठीत न देता घटनादत्त हक्क डावलण्यात आला आहे. अशा स्थितीत कर्नाटक सरकारला उत्तर देण्यासाठी ४५ हून अधिक उमेदवार महापालिकेत निवडून आणण्याचा निर्धार आहे,’ असे महाराष्ट्र एकीकरण मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितले.

शिवसेना व राष्ट्रवादीचा पाठिंबा

भाजप, कॉंग्रेस या पक्षांना मराठी उमेदवारांची कोंडी, अडवणूक करायची असली तरी सीमालढा तेवत ठेवण्यासाठी पाठबळ देणाऱ्या शिवसेना – राष्ट्रवादी या महाराष्ट्रात प्रभाव असलेल्या पक्षांनी बेळगावातील मराठी माणसाच्या मागे ताकद उभी केली आहे. ‘बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक ही सीमा भागातील मराठी भाषकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यासाठी समस्त मराठी भाषकांनी एकदिलाने आपली ताकद दाखवून द्यावी. महापालिकेत मोठ्या संख्येने म.ए. समिती आणि मराठी भाषक उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील तसेच शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Challenge in front of marathi candidates in belgaum municipal corporation akp

ताज्या बातम्या