सांगली : वारणा नदीवरील चांदोली धरण शनिवारी शंभर टक्के भरले असून यामुळे दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ३४.४० टीएमसी पाणीसाठा असलेल्या धरणात आज ३४.३५ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
यंदाच्या हंगामात प्रारंभी चांदोली धरणात केवळ ११.४५ टीएमसी पाणी साठा शिल्लक उरला होता. जून महिना कोरडा गेल्याने जुलैच्या प्रारंभी धरणात केवळ ११.९७ टीएमसी पाणीसाठा झाला. यामुळे चिंता निर्माण झाली होती. तथापि, जुलैमध्ये पश्चिम घाटात सुरू झालेल्या संततधार पावसामुळे धरणात पाणी साठा वेगाने वाढला. एक ऑगस्ट रोजी धरणातील पाणीसाठा २९.७२ टीएमसी झाला होता. ऑगस्टमध्ये अन्य ठिकाणी पावसाने दडी मारली असली तरी चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून मुसळधार पाउस पडल्याने धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला असून शनिवारी धरणातील पाण्याची पातळी ६२६.९० मीटर झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग बंद असून केवळ पायथा विद्युतगृहातून १६०० कयूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
चांदोली धरणातून जुलै महिन्यात नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. यंदाच्या हंगामात सुमारे १२ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याच विसर्गाच्या पाण्यावर सध्या म्हैसाळ योजनेचे पंप सुरू असून योजनेतून जत व मंगळवेढा तालुक्यात पाणी सोडण्यात येत आहे.
मिरज पूर्व भाग, तासगाव, कवठेमहांकाळ, जत व मंगळवेढा तालुक्यातील काही भागात म्हैसाळ योजनेद्वारे सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी देण्यात येते. चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याची पूर्ण क्षमतेने मिटली असून काही प्रमाणात शेतीच्या सिंचनासाठी आवश्यक पाण्याची चिंताही मिटली आहे.
