सांगली : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शिराळा तालुक्यात मुसळधार पाउस सुरू असला तरी अन्यत्र मात्र आज पावसाने उघडीप दिली. चांदोली धरणात प्रतिसेकंद १४ हजार क्यूसेक पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा ४७ टक्के झाला आहे. कृष्णा नदीवरील नागठाणे बंधारा मंगळवारी पाण्याखाली गेला असून खटाव ते नांद्रे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर वारणेवरील ऐतवडे पूलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूरसाठी चिकुर्डे मार्गे प्रवास करावा लागत आहे.
सांगलीत आयर्विन पूलाजवळ पाणी पातळी १९ फूटापर्यंत पोहचली असून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने नदीकाठी जाउन पाहणी केली. जिल्ह्यात शिराळा तालुक्यात मुसळधार पाउस कोसळत असून गेल्या २४ तासात ४४,३ मिलीमीटर पाउस झाला. चांदोली धरण परिसरात सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी झाली असून या ठिकाणी ११८ मिलीमीटर पाउस झाला. धरणातील जलसाठा १६,२२ दशलक्ष घनफूट झाला असून धरण ४७ टक्के भरले आहे. पश्चिम घाटातील अन्य धरणाचा पाणीसाठा आणि टक्केवारी अशी कोयना ३५.७० (३४ टक्के), धोम ६.५९ (४९), कण्हेर ६.२९ (६२), राधानगरी ४.२२ (५०), दूधगंगा ५.४१ (२१), धोम बलकवडी २.०५ (५०), उरमोडी ४.१९ (४२) आणि तारळी १.७३ (३० टक्के).
जिल्ह्यातील कृष्णा नदीवर असलेला पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा मंगळवारी पाण्याखाली गेला असून नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर खटाव ते नांद्रे पूलावरून पाणी वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वारणेवरील कोडोली, मांगले-सावर्डे आणि खोची हे तीन बंधारे पाण्याखाली गेले असून नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. मांगले ते सावर्डे मार्गावरील बंधारा पाण्याखाली गेला असतानाच बंधार्याला जोडणारा रस्ता वाहून गेला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाउस सुरू असला तरी अन्य तालुक्यात आज पावसाने उघडीप दिली आहे. दिवसभरात हलक्या ते मध्यम एकदोन सरी कोसळल्या. मात्र, पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३.४ मिलीमीटर सरासरी पाउस झाला असून काही भागात पेरण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात २७ टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती कृषी अधिक्षक विवेक कुंभार यांनी दिली. खरीपाचे क्षेत्र २ लाख ४६ हजार हेक्टर असून आज अखेर ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
