कोल्हापूर : हसन मुश्रीफ व राजेश पाटील हे राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार विधानसभा निवडणुकीला काठावर निवडून आले आहेत. त्यांनी उगाच गमजा मारू नयेत, असा टोमणावजा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

आमदार पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीवर टीका केली. ते म्हणाले,की राष्ट्रवादी काँग्रेसचे २०१४ मध्ये दोन आमदार होते. तीच संख्या२०१९ मध्येही कायम राहिली. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे यांना ८८ हजार मते पडली. याचा अर्थ तेथील इतक्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस नको आहे. २०१४ साली कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आठ हजार मते मिळाली होती, तर भाजपला ४० हजार मते मिळाली. आकडेवारीतील हा फरक पाहता मुश्रीफ, पाटील तुम्ही कशाच्या जोरावर गमजा मारत आहात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत हिमालयात जाईन, असे खोचक विधान कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी, मी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तोंड काळे करून पुन्हा हिमालयात जाईन, असे जाहीर विधान वसंत व्याख्यानमालेत केले होते, या विधानाची आठवण करून देत जयंत पाटील हे शरद पवार यांना घेऊन हिमालयात जाणार का, असा पलटवार केला.