सांगली : मी साधा गिरणी कामगाराचा मुलगा, निवृत्तीच्यावेळी माझ्या वडिलांना १४०० रूपये पगार होता. मी मोठा नेता नाही, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण हा माझा विषय  नाही असे सांगत भाजपचे जेष्ठ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलणे टाळले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी आपले संबंध खूपच चांगले होते असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेसंदर्भात अपघाताच्या आदल्या दिवशीच अजितदादांशी आपली चर्चा झाली होती. यावेळी दादांनी  निवडणुकीदरम्यान आरोप, प्रत्यारोप झाले असे सांगितले. यावर आपण रात गयी, बात गयी असे बोललो होतो असे सांगितले. यावेळी महापालिकेतील सत्ता विभाजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सांगलीचे काही पदाधिकारी होते, मात्र, दादांनी त्यांना बाहेर पाठवून माझ्याशी चर्चा केली.

रविवारी सांगलीत झालेल्या अपघातानंतर जखमींची विचारपूस करण्यासाठी मंत्री पाटील यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, पृथ्वीराज पाटील, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते. रूग्णांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले, सांगलीत रविवारी बेफाम वाहनाने ठोकरल्याने १६ जण जखमी झाले असून यापैकी आठ जणांना तात्काळ तर अन्य सात जणांना उपचारानंतर आज घरी पाठविण्यात आले आहे. एका महिलेची प्रक्रृर्ती गंभीर असून तिच्यावर खासगी तज्ञ  डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोटार चालक सांगलीत का आला, त्यांने मद्य प्राशन कुठे केले, वाहतूक पोलीसांनी तपासणी केली की नाही याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून अहवाल आल्यानंतर दोषी कुणी आढळले तर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.