चंद्रकांत पाटलांचे जोतिबाला साकडे
महाराष्ट्रात चांगला पाऊस होऊ दे, शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाला बळ दे. यासाठी महाराष्ट्र शासनाला जे करावे लागेल त्यासाठी बळ दे, असे साकडे महाराष्ट्राचे महसूलमंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्राचा कुलस्वामी श्री जोतिबाला घातले.
श्रीक्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्री जोतिबा देवाच्या चत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री पाटील यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार सत्यजित पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार शंभुराजे देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, म्हाडा पुणे विभाग अध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.
महाराष्ट्रात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न ४० हजार कोटीने वाढले. पुढच्या वर्षीही पाऊस चांगला झाला तर उत्पन्न काही हजार कोटीने वाढेल. यासाठी या वर्षी आणि पुढील वर्षीही महाराष्ट्रात चांगला पाऊ होऊ दे, अशी प्रार्थना जोतिबा चरणी पालकमंत्री पाटील यांनी केली. जोतिबा ते पन्हाळा रोप-वे करण्याचा एक प्रस्ताव आला असून, या संदर्भात आवश्यक त्या पूर्तता आणि अडचणी दूर करून सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी प्रशासनास सांगण्यात आले आहे. या प्रस्तावानुसार उपाययोजना प्राधान्यक्रमाने करून रोप वेचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी पालकमंत्री पाटील यांचे श्री जोतिबाची प्रतिमा देऊन स्वागत केले.
जोतिबा विकासकामाला गती- चंद्रकांत पाटील
श्री जोतिबा परिसर विकासाचा पहिल्या टप्प्यातील ३० कोटीचा आराखडा करण्यात आला असून, २५ कोटी शासन आणि ५ कोटी देवस्थान ट्रस्ट भर घालणार आहे. या पहिल्या टप्प्यातील आराखडय़ानुसार ५ हजार भाविकांची सोय होईल या दृष्टीने सर्वसुविधायुक्त चारमजली दर्शन मंडपाची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पूर्ण करून पुढील वर्षी हा दर्शन मंडप भाविकांसाठी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी या वेळी दिली.
