कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आल्यानंतर सदस्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्य जोमाने करावे. पक्षातील वरिष्ठाबद्दल अनुदगार काढत बसण्याऐवजी सामाजिक कार्यावर भर द्यावा, असा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचा सत्कार आज भाजपा जिल्हा कार्यालयात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष अनुक्रमे नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, समरजीतसिंह घाटगे, इचलकरंजी उप-महापौर अनिल डाळ्या, अंबरिष घाटगे, भरमू आण्णा पाटील, सावकार मादनाईक, माधवराव घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. भेटवस्तू देऊन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असल्याने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशी कामगिरी करा. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या ६ जागा किरकोळ मतांनी हातातून निसटल्या आहेत. याबद्दल कोणीही नाराज न होता, पूर्वीच्याच उमेदीने आणि जोमाने पक्ष कार्यात सक्रीय राहावे.

विजयी उमेदवारांची जबाबदारी आता अधिकच वाढली आहे. पक्षामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्यरत रहावे. त्यातून जनतेची विकासकामे करुन, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पदाचा वापर करावा, असा सल्ला पाटील यांनी दिलाय. याचबरोबर जिल्हा परिषद गटनेता पदी तानाजी पाटील यांच्या नावाची घोषणा पाटील यांनी केली.

यावेळी पाटील आणि खासदार महाडिक यांनी या निवडणुकीतील महायुतीला १२ लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले तर महाविकास आघाडीची धाव केवळ साडेतीन लाख मताधिक्यावर थांबली असल्याचे सांगितले.

जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र या निवडणुकीत दिसून आले आहे. आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक भाजप लढवणार आहे, असं खासदार धनंजय महाडिक यांनी घोषीत केले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन लाख मताधिक्क्यापर्यंत मजल मारली आहे,असे सांगत खासदार महाडिक यांनी यापुढंही पक्ष संघटन अधिक बळकट करावे.

याप्रसंगी राहुल चिकोडे, शिवाजी बुवा, मेजर भिकाजी जाधव, डॉ आनंद गुरव, सुशीला पाटील, महेश चौशले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.