सांगली : सध्या पुनरिक्षणाच्या माध्यमातून मतदार यादी निर्दोष करण्यात येत असून मतदार संघाची पूनर्रचना होउन विधानसभेसाठी ६२ मतदार संघ वाढण्याची शक्यता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच लोकसभेच्या जागा ५४३ वरून ६५० होण्याची चिन्हे असून यामुळे जिल्ह्यात एक आमदार व स्वतंत्र दोन खासदार असतील असे संकेतही त्यांनी दिले.

भाजपचा ४६ वा स्थापना दिनानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा सांगलीत पार पडला. या मेळाव्यात पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, सध्या मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण सुरू असून आयोगाचे कर्मचारी घरोघरी येउन मतदारांची पडताळणी करत आहेत. यावेळी काही नावे वगळली जाणार आहेत.

मतदार पडताळणीसाठी घरी आलेल्या कर्मचार्‍यांना योग्य व खरी माहिती दिली पाहिजे. यानंतर निर्दोष मतदार यादी तयार होणार असून पुढील लोकसभा  निवडणुकीत मतदार संघाची पूनर्रचना केली जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे खासदारांची संख्या ५४३ वरून ६५० होईल. तर विधानसभा  मतदार संघांची संख्या २८८ वरून ३५० होईल.

यामुळे सांगली जिल्ह्यात लोकसभेचे दीड ऐवजी दोन स्वतंत्र मतदार संघ होतील आणि आमदारांची एक जागा वाढून आठ ऐवजी ९ आमदार होतील. यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करायला हवी. पक्षाचा कार्यक्रम सरकारची जनसेवेची कामे, सरकार राबवत असलेल्या विविध योजना तळापर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, महापौर धीरज सुर्यवंशी, दीपक शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक आदींसह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, शक्ती केंद्राचे प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.