सांगली : जून पासून मुलींना महाविद्यालय आणि शाळांमध्ये लाथाकाठ्यांचे प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा पालक तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत केली. तसेच महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या मुलींना कमवा व शिका योजनेतून मासिक दोन हजार रूपये देण्याची शासनाची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत  जिल्ह्यातील ५० शाळामधील सुमारे ३६ हजार मुलींना कराटे व ज्युडो प्रशिक्षण देण्यात आले. यामधील १५ हजार मुलींनी प्राथमिक परीक्षा देउन यलो बेल्ट मिळवला आहे. या मुलींना प्रशस्तीपत्र आज पालकमंत्री पाटील यांच्या  हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, पालकमंत्री पाटील यांचे स्वीय सहायक बाळासाहेब यादव, क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, पालकमंत्र्यांच्या पत्नी अंजली पाटील, जिल्हाधिकार्‍यांच्या पत्नी शरदिनी काकडे आदी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले,  महिला सबलीकरण साठी केवळ महिलांनीच नव्हे तर सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. कराटे व ज्युडो खेळाचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलीपैकी १५ हजार ४०० मुलींनी प्राथमिक परीक्षा उत्तीर्णी केली आहे. यापुढील प्रशिक्षणासाठी त्यांना जे शुल्क द्यावे लागेल ते शासन देईल. जून पासून प्रत्येक शाळांमध्ये स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाविद्यालयात शिकणार्‍या पाच लाख मुलींना महाविद्यालयीन व वसतीगृह  शुल्क आकारले जात नाही, या व्यतिरिक्त शिक्षण घेत असलेल्या मुलींना दर महिना दोन हजार रुपये कमवा शिका योजनेतून देणार असल्याची घोषणा मंत्री पाटील यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना खासदार पाटील म्हणाले, मुलींचे प्रात्यक्षिक पाहत असताना  मला  माझ्या दोन मुलींची आठवण झाली. मुलींची स्वसंरक्षणातील सिध्दता पाहून मला माझे म्हातारपण सुखात जाईल असा विश्‍वास निर्माण झाला  आहे.

यावेळी कराटे व ज्युडोचे प्रशिक्षण  घेउन यलो बेल्टची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी काही निवडक प्रशिक्षणार्थी मुलींनी कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले.