सांगली : विविध क्रीडाप्रकारांत उत्तुंग कामगिरी करणार्या ३७२ खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये विनापरीक्षा थेट सामावून घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना केले.
भारतीय विद्यापीठे महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे उद्घाटन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते येथील कै. वसंत दादा पाटील स्मृती स्मारक, कृष्णा नदीवरील रॉयल बोट क्लब येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, कलापि उद्योगाचे योगेश लोहकरे, अधिसभा सदस्य संजय परमणे, काव्यश्री नलवडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्रात करिअर घडविणार्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनपर धोरणे लागू केली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणार्या खेळाडूंना थेट वर्ग एकची शासकीय नोकरी, राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक विजेत्यांना वर्ग दोन, तर राज्य स्तरावरील विजेत्यांना वर्ग तीन व चारची पदे देण्याचा निर्णय शासनाने घेतला. याशिवाय, क्रीडापटूंना आर्थिक बळ देण्यासाठी आकर्षक रोख पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांना रुपये २ कोटी, राष्ट्रीय स्तरावर रूपये एक कोटी आणि राज्य स्तरावर रुपये ५० लाख इतकी बक्षिसे दिली जात आहेत, असे त्यांनी नमूद केले.
कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, सांगलीतील कृष्णा नदीवरील स्पर्धेचा ट्रॅक हा शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून पाण्याचा प्रवाह स्थिर असल्यामुळे सर्व स्पर्धकांना समान संधी मिळते. स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना उत्कृष्ट क्रीडा स्पर्धात्मकतेसह सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या स्पर्धेमध्ये देशाच्या विविध भागातील ४० विद्यापीठातून ६८५ पुरूष व महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून स्पर्धा दि. ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
