सांगली : नटसम्राटमध्ये आप्पा बेलवलकर जसे कुणी घर देता का घर असे म्हणत असतो तसे आता कुणी मला घेता का असे आमदार जयंत पाटील म्हणत आहेत. यामुळे त्यांची अवस्था नटसम्राटासारखी झाली असल्याची टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
मंत्री पाटील यांनी सांगली महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सुधीर गाडगीळ, निवडणूक प्रभारी शेखर इनामदार, दीपक शिंदे, पृथ्वीराज पवार आणि त्या त्या प्रभागातील भाजपचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, कुणी काहीही सांगत असले तरी महापालिकेची सत्ता भाजपलाच मिळणार आहे.या निवडणुकीत भाजप ७८ जागा लढवत असून यापैकी ५५ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होतील. हे मी सर्व्हेक्षणाच्या आधारे सांगत आहे.
आमदार पाटील यांनी या निवडणुकीत पैशाचा पाउस पडेल अशी टीका केली होती, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कायद्याचे पालन करण्याची आणि राबविण्याची यंत्रणा आहे. पैशाचा पाउस पडण्याचे आढळले तर तक्रार करण्यास कुणी अडवलेले नाही. पराभव का झाला तर पैशांचा पाउस झाला, मतचोरी झाली ही कारणे दिली जातील. विरोधकांना पराभवानंतर कोणती कारणे सांगायची हेही आठवणार नाही.
सांगली महापालिकेच्या विकासासाठी १०० कोटी रूपये दिले. त्याच काळात सांगलीतील काही समस्यांची सोडवणुक करण्यात आली. शहरात तीन हेलिपॅड होत आहेत. तसेच विमानतळाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल. महापालिकेची सत्ता भाजपच्याच ताब्यात येणार असा जनतेचा कल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर मित्र पक्षांनाही सोबत घेऊ असेही ते म्हणाले.
