दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : भाजप सरकारच्या काळात महसूल, सहकार वा सार्वजनिक बांधकामसारखी महत्त्वाची खाती भूषविताना जिल्ह्याच्या राजकारणात चंद्रकांत पाटील यांनी वातावरण तयार केले. पण जिल्ह्याच्या राजकारणात ते प्रभाव पाडू शकले नाहीत. नव्या सरकारमध्ये तुलनेत दुय्यम दर्जाची खाती वाटय़ाला आल्याने चंद्रकांतदादा जिल्ह्याच्या राजकारणात कितपत प्रभाव पाडतील याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. महत्त्वाचे खाते नसल्याने विरोधकांना वाटणारी धास्ती आणि स्पर्धाही कमी झाली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात मोठमोठय़ा जबाबदाऱ्या मिळत राहिल्याने चंद्रकांतदादांचे पक्ष संघटनेतील प्रभुत्व अधोरेखित होत गेले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने मंत्रिपद गेले तरी त्यांचे राजकीय वजन कायम राहिले. नव्या सरकारमध्ये महसूल वा बांधकाम यापैकी एक महत्त्वाचे खाते त्यांना मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात उच्च शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज या कनिष्ठ खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदही गेले. भाजप अंतर्गत राजकारणात त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आल्यानंतर पाटील यांनी मनावर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. हीच वेळ खातेवाटपानंतर त्यांच्या वाटय़ाला आली. पण, वरकरणी त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. ‘मिळालेली खाती समाधानकारक आहेत. कोणत्याही खात्याचे मंत्रीपद छोटे व मोठे नसते. उलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे , असा उल्लेख करून आपल्या मंत्रिपदाच्या कामकाजाचा धागा त्यांनी थेट पंतप्रधानांशी जोडत मुत्सद्दीपणाचे दर्शन घडवले आहे.

पाटील यांनी पाच वर्षे मंत्री असताना कोल्हापुरात आडवळणावरचे कोल्हापूर, पुष्पोत्सव, सुशोभीकरण, सर्वात उंच तिरंगा ध्वज असे काही उपक्रम राबवले. त्यामध्ये होता तो केवळ उत्साहीपणा. कोल्हापूरकरांच्या पदरी उपेक्षा आली. मंत्रिपदाच्या काळात तालमी, सार्वजनिक संस्था, मंडळे यांना त्यांनी मुक्त हस्ते मदत केली. भाजपची भक्कम बांधणी होण्याच्या दृष्टीने याचा काहीच उपयोग झाला नाही. कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचा पराभव हे त्याचे द्योतक मानले जाते. नव्याने मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरचा विकास करण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला आहे. आता तरी त्यांनी कायमस्वरूपी, शाश्वत विकासावर भर देतानाच विठ्ठलाभोवती जमणारा बडव्यांचा गोतावळा दूर करून खऱ्या भक्तगण कार्यकर्त्यांना जवळ करण्याची गरज तळातून व्यक्त केली जात आहे.

विरोधक सैलावले?

पाटील सहकारमंत्री असताना चौकशीच्या बडग्यात सापडायला नको असा सावध पवित्रा घेऊन काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सहकारातील काहींनी भाजपची सलगी साधत चौकशीचे लटांबर दूर केले. पाटील यांच्याकडे कमी महत्त्वाची खाती आल्याने विरोधकांच्या लेखीही राजकीय महत्त्व कमी झाले आहे. अत्यंत टोकाची राजकीय स्पर्धा करावी लागण्याची विरोधकांना वाटणारी धास्ती काही प्रमाणात कमी झाली आहे. चंद्रकांतदादांच्या विरोधातील पक्षातील छुपा गटही याच कारणाने खुशीची गाजरे खाताना दिसत आहे. त्यांच्या खाजगीतील प्रतिक्रिया यावर भाष्य करण्यास पुरेशा ठरल्या आहेत. थेट आणि छुपे विरोधक यांचा इरादा लक्षात घेऊन पाटील यांना मंत्रीपदाचा लाभ घेऊन भाजपची भक्कम बांधणी करून शून्यवत झालेले आमदार संख्याबळ वाढवण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागणार आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil test maintaining political influence kolhapur ysh
First published on: 19-08-2022 at 00:02 IST