कोल्हापूर : कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. गेली अडीच महिने आंबा व काजू उत्पादक शेतकरी रस्त्यावरची लढाई करत असताना राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने हा यापूर्वीचा अनुभव पाहता आंबा व काजू बागायतदार १५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देणारच असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.

शुक्रवारी ( १५ मे) मुंबईत निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांची व संघटनांची आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलविण्यात आली होती.

शासनाचे कागदी घोडे

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी म्हणाले कि , विमा कंपनीच्या जाचक अटी व नियमांमुळे राज्य शासन आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात असमर्थ ठरले आहे. त्याबरोबरच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडे (एनडीआरएफ) राज्य शासनाने अद्याप शेतकरी नुकसान भरपाई प्रकरणी कोणतीही मदत मागितली नाही. तसा प्रस्तावही सादर केलेला नाही. प्रशासन व राज्य सरकारकडून पंचनाम्याच्याबाबतीत कागदी घोडे नाचवले जात आहे. राज्य शासनाने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदतीबाबत वेळकाढूपणा करू लागले आहे, असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.

कोकणातील शेतकरी संकटात

ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, कोकणातील शेतकरी आता आत्महत्या करू लागले आहेत. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संकटात टाकले जात आहे. यामुळे राज्य शासनाने मदतीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.

पंचनामे रखडले

आमदार भाई जगताप यांनी सांगितले की, आंबा व काजू हे पिक कोकणातील शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखले जात आहे. यंदा हवामानातील बदल, अवकाळी पाऊस या कारणांमुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. पंचनामे करण्याबाबत यंत्रणा अपुरी पडली असल्याने अजून ५० टक्के पंचनामे पुर्ण झाले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मंत्र्यांची उपस्थिती

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पणन , कृषी , फलोत्पादन , मदत व पुनर्वसन आदी विभागाचा आढावा घेऊन माहिती घेतली. बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी आयुक्त सुरज मांढरे, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, धर्मनिरपेक्षित जनता दलाचे प्रभाकर नारकर, राजन राजे, शेकापचे राजेंद्र कोरडे , मनसे प्रवक्ते कुणाल माईनकर , माकपचे अरमाईटी इराणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.