कोल्हापूर : दोन वर्षांच्या कालावधीनंतर भक्तिभावात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा रथोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक रांगोळय़ा, मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, फुलांच्या पाकळय़ांचा गालिचा, अंबा माता की जयह्णचा अखंड गजर, हजारो भाविकांची उपस्थिती आणि चांदीच्या रथात विराजमान झालेली उत्सवमूर्ती.. अशा मंगलमय वातावरणात रात्री नगरप्रदक्षिणा पार पडली.
करोना साथीमुळे दोन वर्ष रथोत्सवाच्या परंपरेमध्ये खंड पडला. यंदा निर्बंध दूर झाल्याने मोठया उत्साहात रथोत्सव पार पडला. सोहळा पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी झाली. दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा रथोत्सव साजरा केला जातो. रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर अंबा माता की जयह्णच्या जयघोषात रथोत्सवाला देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
बँड पथके, लेझीम पथके, चौऱ्या आणि मोर्चेलधारी सेवक, अशा लवाजम्यासह रथ नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. तुळजाभवानी मंदिरासमोर रथ आल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. श्री महालक्ष्मी भक्त मंडळ, अन्नछत्रातर्फे आतषबाजी करण्यात आली. करवीर नाद ढोल-ताशा पथकाने सादरीकरण केले. न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे फुलांच्या पायघडय़ा, रांगोळय़ांसह आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. महापुराच्या काळात आपत्कालीन व्यवस्थेसाठी रेस्क्यू बोट व्हाईट आर्मी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली.