कोल्हापुरात धार्मिक अशांतता निर्माण झाली आहे. औरंगजेबाचे फोटो काही तरुणांनी व्हॉट्स अॅप स्टेटसला ठेवल्याने गेल्या दोन दिवासंपासून कोल्हापुरात राडा सुरू आहे. याविरोधात हिंदुत्त्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. बुधवारी कोल्हापुरात कडकडीत बंदही ठेवण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज यांनी पोलिसांना मोलाचा सल्ला दिला आहे.
सातत्याने कोल्हापूर आणि आजूबाजूची गावं अशांत आहेत. या सर्व पार्श्वभूमीर येथील पोलीस यंत्रणा कमी पडली का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, “आता जे झालं ते झालं. ते बदलता येणार नाही. परंतु, यापुढे पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे. सीआयडीसारख्या ज्या यंत्रणा आहे त्यांना अधिक सक्रिय केलं पाहिजे.”
“कोल्हापुरात काल घडलेला प्रकार कधीच घडला नव्हता. माझं बोलणं झालं होतं. कालच सांगितलं होतं की, काही असलं तर मला बोलवा. दोन्ही समाजात सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून माझा काही उपयोग होत असेल तर करून घ्या”, असंही छत्रपती शाहू महाराज म्हणाले.
हेही वाचा >> Video : सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट, ४०० जणांवर गुन्हे, ३६ जण अटकेत; कोल्हापूर दंगलीप्रकरणी पोलीस म्हणाले…
कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात
“कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती काल दुपारपासून पूर्ववत झाली आहे. ४ एसपीआरएफच्या तुकड्या, ३०० पोलीस कॉन्स्टेबल, ६० पोलीस अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत”, अशीही माहिती त्यांनी दिली. “कोल्हापुरात औरंगजेबाचे व्हॉटसअॅपला स्टेटस ठेवले असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर पोलीस खातं तत्काळ सक्रिय झालं होतं. मंगळवारपासूनच संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही गावं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं”, अशीा माहिती कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.