कोल्हापूर : महायुती स्वरुपात एकत्र राहून गोकुळला पुढे न्या, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचालकांना दिला,कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर त्यांच्यासह संचालक मंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी हा सल्ला दिला.

या वेळी ‘गोकुळ’च्यावतीने फडणवीस यांचा श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ व गोकुळची दुग्ध उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, जनसुराज्य युवाशक्ती प्रदेश अध्यक्ष समित कदम उपस्थित होते. ‘गोकुळ’च्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्यानंतर फडणवीस यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येईल,असे आश्वासन दिले. गोकुळच्या भविष्यातील औद्योगिक, ऊर्जा बचत व गुणवत्ता आधारित योजनांवर या वेळी चर्चा झाली. गोकुळचे स्वयंपूर्ण ऊर्जानिर्भरता या बाबतीत राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले