कोल्हापूर : वस्त्र नगरी इचलकरंजी येथे उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (१५ डिसेंबर) होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली. हा सोहळा भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

इचलकरंजी येथील मुख्य मार्गावर असलेल्या मध्यवर्ती के. एल. मलाबादे चौकामध्ये अत्याकर्षक शंभू तीर्थ साकारण्यात आले आहे. येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळावरणाच्या निमित्ताने गेला आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता या पुतळ्याच्या अनावरणाची ओढ शंभू प्रेमींना लागली आहे. हा सोहळा १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने , आमदार राहुल आवाडे , माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची उपस्थिती आहे. हा कार्यक्रम भव्य दिव्य पद्धतीने व्हावा यासाठी स्मारक समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले असल्याचे गजानन महाजन गुरुजी यांनी सांगितले.

विकास कामांचा धडाका

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने विविध विकास कामांचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या १२ कोटी विकास कामांचा विकास कामांचे भूमिपूजन महासत्ता चौक येथे होणार आहे. नारायणराव घोरपडे नाट्यगृहाचे भूमिपूजन, पंचगंगा नदी जॅकवेल कामाचे लोकार्पण, जिल्हा नियोजन मंडळातील विविध विकास कामे तसेच इतर काही कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्याकडून नियोजन केले जात आहे.

पत्रकार परिषदेसाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान(समिती) कडून अरविंद माने- उपाध्यक्ष, प्रसाद जाधव, युवराज बोने-पाटील- खजिनदार, मंगेश मस्कर, ॲड शांतीभूषण मुदगल, संतोष सावंत, सुनील इंगळे, महेश जाधव, सतीश घोरपडे, अभिनव सुतार आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरण तसेच विकास कामांचे उद्घाटन शुभारंभ या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने इचलकरंजी शहरांमध्ये वातावरण पाहायला मिळत आहे