कोल्हापूर : पाकिस्तानविरोधातील युद्धातील पराक्रमाबद्दल भारतीय सैन्य दलाला सलाम करण्यासाठी, भारतीय जनतेची एकजूट दाखवण्यासाठी शनिवारी सकाळी कोल्हापुरात, तर सायंकाळी इचलकरंजीत नागरिकांची पक्षेतर तिरंगा एकता रॅली काढण्यात आली. भाजपचा प्रभाव असलेल्या या रॅलीतून देशभक्तीची प्रचिती घडवण्यात आली.

कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. राष्ट्रप्रेमी नागरिक, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, जिल्ह्यातील माजी सैनिक, महिला आदींनी भारत माता की जय, वंदे मातरम्, भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय सैनिक यांच्या वेशातील चिमुकल्यांनी सहभाग नोंदवला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फेरीची सांगता झाली. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, महेश जाधव, शौमिका महाडिक, राहुल चिकोडे, गायत्री राऊत, रुपाराणी निकम, संगीता खाडे, धनश्री तोडकर, माधुरी नकाते, संगीता तांबे, विद्या बनछोडे सहभागी झाले होते.

इचलकरंजीत उत्साह तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा, हातात राष्ट्रध्वज घेत नागरिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह, पाकिस्तान विरोधातील निषेधाच्या घोषणा देत अन् भारतीय सैन्य दलाचे प्रोत्साहन वाढवत इचलकरंजीत भव्य ‘तिरंगा एकता रॅली’ काढण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या माध्यमातून भारतीय जवानांना हजारोच्या संख्येने सामूहिक सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत होऊन महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, सुभेदार जयपाल कोरेगांवे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहर अध्यक्ष अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे, अशोक स्वामी, अहमद मुजावर, अलका स्वामी, मौशमी आवाडे आदी सहभागी झाले होते.