सांगली : नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने सरकारने रूग्णालयात दाखल केल्याच्या निर्षेधार्थ सांगली मिरजेत सोमवारी निषेध आंदोलन झाले, तर जतमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

नीट पेपर फुटी प्रकरणी सीजेपीकडून केंद्रिय मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी गेले तीन आठवडे दिल्लीत आंदोलन सुरू असून या आंदोलनात सोनम वांगचूक हे उपोषण करत असताना त्यांच्या प्रकृर्तीचे कारण पुढे करत सरकारने रूग्णालयात दाखल केले. याचे पडसाद सांगली मिरजेसह जिल्ह्यात उमटले आहेत.

सोमवारी सांगलीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि वांगचूक यांच्यावर केंद्र सरकारने जबरदस्ती केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रिय मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची  मागणी करण्याबरोबरच केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सतीश साखळकर, कॉ. उमेश देशमुख, वि.द.बर्वे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शंभोराज काटकर यांच्यासह हणमंत पवार, रविंद्र वळवडे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सोनम वांगचूक यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केल्याचा निषेधार्थ आणि सीजेपी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सांगलीत सर्व पक्षिय आंदोलन करण्यात आले.

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष  देवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, पक्षाचे निरीक्षक शेखर माने, सरचिटणीस बाळासाहेब पाटील माजी स्थायी सभापती संगीता हारगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे इन्कलाब फौंडेशन व राष्ट्र सेवा दलाच्यावतीने वांगचूक यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

दरम्यान, वांगचूक यांना आंदोलन स्थळापासून पोलीसांनी जबरदस्तीने रूग्णालयात हलविल्याचा जतमध्ये  निषेध करण्यात आला. तहसिल कार्यालयासमोर काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुहासनाना शिंदे व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रिय मंत्री प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधान यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.