पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर राज्यातील विवेकशील विचारसरणीला जबर धक्का बसल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत राहून टीकेचा झोत पोलीस तपास यंत्रणेवर राहिला. हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून ते कालपर्यंत गेले ७ महिने कटू बोल ऐकाव्या लागलेल्या पोलिसांना बुधवारी प्रथमच तपासात निश्चित असे सूत्र हाती लागल्याने कौतुकाचे बोल अन् अभिनंदनाचा वर्षाव पाहायला मिळाला. याच वेळी केवळ संशयितावर अटकेची कारवाई न करता मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची धमक दाखवावी, अशा प्रतिक्रिया पानसरे कुटुंबीयांपासून ते चळवळीतील पुरोगामी नेतृत्वाकडून व्यक्त होत आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे या प्रभावी नेतृत्वाचा सहा महिन्यांच्या अंतरात गोळय़ा घालून खून करण्यात आल्याने पुरोगामी चळवळीला जबर धक्का बसला. या दोघांच्या खुन्यांना पकडण्यासाठी गेली दीड महिने सातत्याने वेगवेगळय़ा प्रकारची आंदोलने होत आहेत. राज्याच्या विधिमंडळातही कासवगती तपासाबद्दल जोरदार टीका करण्यात आली होती. याची दखल घेऊन संजय कुमार या अनुभवी अधिकाऱ्याकडे पानसरे खुनाच्या तपासाची सूत्रे सोपवण्यात आली. दिमतीला अनेक विशेष पथके तनात करण्यात आली. त्यातूनच संजय कुमार यांच्या हाती समीर गायकवाड हा तरुण लागला आहे. सनातन संस्थेचा कार्यकर्ता असलेला समीर प्राथमिक माहितीत खुनाचा संशयित आहे. खून प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कितपत सहभाग आहे हे शोधण्याचे काम पोलिसांना ७ दिवसांच्या पोलीस कोठडीच्या कालावधीत करण्याचे आव्हान असणार आहे.
दाभोलकर व पानसरे यांचा खून झाल्यापासून पुरोगामी चळवळीचे नेते, कार्यकत्रे व कुटुंबीय यांच्याकडून हा हल्ला विवेकशील विचाराला मानणाऱ्यांकडून होणे शक्य नाही, तो जातीयवादी शक्तींकडून झाला असावा, असे वारंवार सांगितले गेले आहे. त्यांनी आपला संशय सनातन संस्थेवर असल्याचेही प्रकट केले होते. पानसरे यांच्या निधनानंतर सनातन प्रभातने लिहिलेल्या लेखात वापरलेली भाषा क्लेशदायक होती आणि पोलिसांनी पानसरे खून प्रकरणी अटक केलेला समीर गायकवाड हा संशयित व त्याचे कुटुंबीय हे नेमके सनातन संस्थेशी निकटचे संबंधित असल्याचे संजय कुमार यांनी सांगितले आहे. या माहितीवरूनच करवीरनगरीतील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपला संशय योग्य असल्याचे नमूद करीत पानसरे खुनातील सूत्रधार कोणत्या आश्रमातील आहेत याकडे बोट दाखवत तिथपर्यंत पोहोचण्याची धमक दाखवावी, अशी मागणी बुधवारी केली आहे.
पानसरे खून प्रकरणाचा तपास करताना शासन कसलीही कसूर ठेवणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितले होते. तपासाच्या ओघात बडय़ा आसामींपर्यंत पोलिसांना पोचावे लागले तरी तेव्हाही मुख्यमंत्र्यांकडून नि:संदिग्ध भूमिका घेतली जाण्याची गरज व्यक्त होत आहे. अलीकडेच कर्नाटकातील ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचा खून झाल्यानंतर कलबुर्गी, दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबीयांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन खुनाचा तपास गतीने करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कर्नाटकात तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरू लागली आहेत, याचाच एक परिणाम म्हणून पानसरे खुनाचा तपास एक पाऊल पुढे सरकला असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. पानसरे खुनाच्या शोधातील पडलेले कारवाईचे पहिले पाऊल अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचून हल्लेखोर, सूत्रधार यांना शिक्षा व्हावी अशी एकमुखी मागणी जोर धरू लागली आहे.