|| दयानंद लिपारे

वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत कोल्हापूरमधील नेत्यांमध्ये संघर्ष

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये समन्वय, संवाद यावर भर दिला जात आहे. तथापि वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रमुख नेते आमनेसामने आले आहेत. या निवडणुकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ या बड्या नेत्यांना वगळून आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्र्यांना रोखण्याच्या प्रयत्नांमुळे राजकारण तापले आहे.

हे आव्हान स्वीकारून दोन्ही मंत्र्यांनी बाजार समितीवर सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यामुळे जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या बरोबरीने वडगाव बाजार समितीची निवडणूक गाजण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील अलीकडच्या निवडणुका पाहता त्यामध्ये सर्वसमावेशकता, समन्वय याचे चित्र दिसले होते. गोकुळच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांना आपल्या सोबत घेतले होते. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत टोकाचा संघर्ष होणार असे चित्र असताना ती अनपेक्षितपणे बिनविरोध झाली. सतेज पाटील यांचा कठीण मार्ग सोपा करण्यात कोरे यांनी पुढाकार घेतला होता.

आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होत आहे.   पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीतही बँकेवर वर्चस्व असलेले मुश्रीफ यांनी सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.

मंत्र्यांना आव्हान

संवाद, समन्वयाचे हे चित्र जिल्ह्यात दिसत असताना वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मात्र अचानक संघर्ष उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक म्हटली की त्याची प्रमुख सूत्रे हसन मुश्रीफ , सतेज पाटील या मंत्र्यांकडे असतात. मात्र १०० कोटी रुपयांची तगडी उलाढाल असलेल्या वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत चक्क दोन्ही मंत्र्यांना चार हात दूर ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. हातकणंगले तालुका कार्यक्षेत्र असलेल्या या निवडणुकीमध्ये तालुक्याचे राजकारण करणाऱ्या नेत्यांची चलती राहिली आहे. यातूनच येथे सत्तेत असलेले आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक या राज्यातील राजकारणात भाजपला र्पांठबा दिलेल्या नेत्यांनी एकत्रित येऊन आघाडीची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या आघाडीमध्ये शिवसेनेचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही सामावून घेतले आहे. या प्रमुख नेत्यांकडे हुकमी मतदान आहे. यातूनच त्यांनी मंत्र्यांनाही सत्तेच्या सारीपाटातून बाजूला सारण्याची भूमिका घेतली आहे.

विरोधकांकडून आव्हान

  जिल्ह्यातील निवडणुकांचे राजकारण एकदिलाने व्हावे असा प्रयत्न सुरू ठेवला असताना वडगाव बाजार समितीचे राजकारण याला छेद देणारे ठरले आहे. सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने दोन्ही मंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांचे आव्हान शिंगावर घेण्याचे ठरवले आहे. मुश्रीफ-पाटील हे दोन्ही मंत्री एकत्र असले तालुक्यातील मतदानाची यंत्रणा गतिमान करण्याची ताकद त्यांच्याकडे कितपत आहे. यावर त्यांच्या यशाचे समीकरण अवलंबून असणार आहे. त्यांच्यासोबत आघाडीची घोषणा करताना काँग्रेसचे आमदार राजू आवळे हेच सोबत होते. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने सोबत राहतील असेही चित्र आहे. पण तेवढ्याने विरोधकांचे आव्हान संपुष्टात आणणे शक्य आहे का, हा प्रश्न आहे. वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला विचारात घेणे अपेक्षित होते. आम्हाला विचारात घेणार नसेल तर ताकदीने लढाई जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहोत.आमच्या आघाडीला चांगले यश मिळेल, असे मत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

कोरे-आवळे संघर्ष

  वडगाव बाजार समितीची निवडणूक असली तरी हातकणंगले तालुक्याच्या राजकारणाचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा आहे. या तालुक्याचे आमदार राजू आवळे असले तरी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांना पाय रोवायचे आहेत. यापूर्वी त्यांनी येथे पक्षाचा आमदार निवडून आणला होता. पुढील काळात आगामी निवडणुकीत पक्षाचा आमदार निवडून यावा असे पूरक वातावरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी महाडिक, आवाडे, यड्रावकर, शेट्टी यांचीही मदत लागणार असल्याने त्यांना सत्तेत संधी देऊन बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. जिल्ह्यातील नेत्यांपेक्षा या दोन आमदारातील कडवा संघर्ष हेच आकर्षण ठरणार आहे. त्यावरच तालुक्यावर कोणाचे वर्चस्व आहे हेही पुन्हा सिद्ध होणार आहे.