कोल्हापूर : सहा महिन्यांपासून कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटक जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरातील वातावरण त्यांना बिघडवायचे आहे का याचा शोध पोलिस यंत्रणेने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.

अलीकडेच कणेरी मठ येथे झालेल्या संत संमेलनात विश्‍व हिंदु परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी ख्रिस्ती आणि मुस्लीम संस्थांना विदेशातून धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याचे विधान केले होते. त्या विरोधात पुरोगामी संघटनांनी जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कोल्हापूरला बदनाम करणाऱ्या परांडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

हेही वाचा : कोल्हापूरचे चुकते कोठे? खासदार शाहू महाराजांना पडला प्रश्न; तीन खासदार असतानाही असे का, याची चिंता

या घटनेच्या अनुषंगाने सतेज पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेचच कोल्हापुरात येऊन बाहेरचे लोक प्रक्षेपक विधान करीत आहेत. अशी वाक्य उच्चारणामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे. अशा विधानांमुळे जिथे बोलले गेले त्या संस्थेला अडचणीला सामोरे जावे लागते. बोलणारा मात्र बोलून जातो.

कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्यांचे खून होत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी गृह राज्य मंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर मधील कायदा – सुव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. पोलीस यंत्रणा राजकीय यंत्रणेत अडकल्याचे दिसून येत आहे. दर दोन दिवसाला एक खून कोल्हापुरात होत आहे. कळंबा कारागृहात दोन दिवसाला नवनवीन गोष्टी सापडत आहेत, याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : महाराष्ट्र-कर्नाटक राज्याने समन्वय ठेवल्यास महापुराची तीव्रता कमी – एम. के. कुलकर्णी; पूर परिषदेला नागरिकांचा प्रतिसाद

शक्तीपीठ विरोधीचा मोर्चा शक्तीनिशी

कोल्हापुरात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात रणकंदन सुरु आहे. जिल्ह्यात बाधित होणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला थेट विरोध केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांकडूनही महामार्गाला विरोध सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारी (१८जून) कोल्हापूरमध्ये दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा शक्तिपीठ महामार्ग विरोधात काढण्यात येणार आहे.

हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस

या सर्व पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले की, भाजपने या संदर्भातील भूमिका घेतलेली नाही. महायुतीमधील दोन घटक पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी भाजपने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला किती किंमत आहे हे कळत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. कंत्राटदारांसाठीच शक्तिपीठ महामार्ग होत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. उद्याचा मोर्चा मोठ्या शक्तीने काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राने सूचना दिल्या असल्याने महाराष्ट्र सरकार महामार्ग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला.