सांगली : भाजपला महापालिकेच्या सत्तेपासून रोखण्यासाठी समविचारी पक्षाशी बोलणी सुरू असून काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेत पुढाकार घेईल असे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे १८ सदस्य निवडून आले असून महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तीन सदस्य निवडून आले आहेत. तर भाजपचे ३९ सदस्य विजयी झाले आहेत. भाजपला बहुमतासाठी एका मताची गरज आहे. तथापि, यानंतर स्थायी  समितीमध्ये बहुमत राखण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याने भाजपपुढे सत्ता स्थापन करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेत निरंकुश सत्ता  स्थापन करण्यासाठी भाजपला आणखी मित्रांची गरज भासत आहे.  तर भाजप  विरोधात  निवडणूक लढवून विजयी झालेली अन्य सर्व  पक्षांची सदस्य संख्याही ३९ आहे.

या पार्श्‍वभूमीवर आज  काँग्रेसचे नवनिर्वाचित सदस्यांनी वांगी (ता. कडेगाव) येथे जाउन स्व. पतंगराव कदम यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार डॉ. कदमही उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. कदम यांनी सांगितले,  सांगली महापालिकेत काँग्रेस दोन नंबरचा आज पक्ष बनला असून सत्ता स्थापनेबाबत काँग्रेसच्या समविचारी पक्षांसोबत आम्हीही प्रयत्न करणार आहोत. काँग्रेस हा पक्ष सोडून ज्या पक्षांच्या नावांमध्ये काँग्रेस आहे ते सर्व आमच्या संपर्कात आहेत, सत्ता स्थापनेबाबत त्यांच्याशी चर्चा आम्ही सुरू केलेली आहे. काही नेत्यांनी कालच याबाबत संपर्क साधला होता. तसेच खासदार विशाल पाटील यांनीही याबाबत भेट घेउन चर्चा केली आहे. ज्या समविचारी पक्षांचे नगरसेवक निवडून आलेत ते आमच्या संपर्कात आहेत, त्या पक्षाकडून आमच्याकडे काही प्रस्ताव आलेले आहेत, या प्रस्तावाबत बसून चर्चा करण्यात येईल. सांगलीत ५५ जागाच्या वर आम्ही जिंकू असं म्हणणार्‍या भाजपला बहुमत गाठता आले नाही हाच त्यांना मोठा धक्का असल्याची टीका कदम यांनी भाजपवर केली.

दरम्यान, महापालिकेत दोन नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर लोकसत्ताशी बोलताना  म्हणाले, पालकमंत्री चंद्रका्रत पाटील यांनी अभिनंदनासाठी फोन केला होता. भाजप सोबत सत्तेत जायचे की अन्य पर्यायावर विचार करायचा याचा निर्णय पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील. त्यांच्या आदेशाने पुढील निर्णय घेण्यात येईल.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे म्हणाले, आमच्या अपेक्षेपेक्षा काही जागा कमी मिळाल्या हे मान्य केले तरी अल्पकालावधीत पक्षाने मिळवलेले यश निश्‍चितच कौतुकास्पद आहे. पुढील निर्णय आमच्या पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून त्यांनी येत्या दोन दिवसात पुढील निर्णय कळवतो असे त्यांनी सांगितले आहे. यानंतरच पुढील हालचाली होतील.