कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आघाडी आणि राष्ट्रवादीच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मुसंडी मारत दोन अपक्षांसह २९ जागा मिळवीत सत्तेच्या दिशेने कूच केली आहे. काँग्रसचे माजी मंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यात गत सभागृहाप्रमाणेच संयुक्त सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली आहे. स्थानिक ताराराणी आघाडीने २० जागा मिळवीत चमकदार कामगिरी केली असली, तरी या आघाडीशी हातमिळवणी करणाऱ्या भाजपा (१२) व शिवसेना (४) या राज्यातील सत्ताधाऱ्यांचे स्वबळावर येण्याच्या स्वप्नाचा फुगा फुटला आहे. तर मनसेने खाते उघडले आहे.
महापालिका निवडणुकीच्या ८१ प्रभागातील रणसंग्रामामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप व ताराराणी आघाडीला लक्षणीय यश मिळणार अशी सुरुवातीला हवा होती. तुलनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना फारसे स्थान मिळणार नाही, असेही चित्र निर्माण करण्यात आले होते. प्रत्यक्षात सोमवारी निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा चित्र पालटल्याचे दिसून आले. मतदारांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकाकी लढत देणाऱ्या काँग्रेसला  प्राधान्य दिले. काँग्रेस २७ जागांवर विजय प्राप्त केला असून २ अपक्षही त्यांना मानणारे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी १५ प्रभागात त्यांचा विजय झाला.
भाजपाने या निवडणुकीत तिप्पट यश मिळवले आहे. या पक्षाची उडी ३ जागांवरून १२ जागांवर पोहचली असली, तरी त्यांनी केलेल्या दाव्याच्या तुलनेत हे यश नगण्य स्वरूपाचे आहे. गुन्हेगारी पाश्र्वभूमीची टीका झालेल्या ताराराणी आघाडीसोबत भाजपाने निवडणूक लढविली होती. या आघाडीला २० जागांपर्यंत मजल मारता आली. तर शिवसेनेला अवघ्या चार प्रभागांमध्ये यश मिळाले आहे. त्यामुळे भाजप, ताराराणी आघाडी व शिवसेना हे सत्तासमीकरण महापौर बनण्यात यशस्वी ठरण्यासारखे नाही. मनसेचे राजू दिंडोल्रे यांनी ही निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवून यश मिळवले असून आता ते सभागृहात मनसेचे सदस्य असतील.