सततच्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रात शेती व्यवस्थेपुढे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. यातूनच या समस्येतही तग धरून राहील अशा पीक पद्धतीचा शोध घेण्याचा विचार सध्या सुरू झाला आहे. यासाठीच शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शेती कृषी शास्त्रज्ञ, अभ्यासक व माजी कुलगुरू अशा मान्यवरांच्या एका बैठकीचे नुकतेच आयोजन केले होते. याच नव्या विचारांचा हा वेध

सततच्या महापुराने नदीकाठच्या शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. हमखास उत्पन्न मिळवून देणारे ऊस पीक पाण्यात बुडून खराब होत असल्याने त्याऐवजी पर्यायी पीक पद्धतीचा शोध घेतला जात आहे. विशेषत: पश्चिाम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या साखर पट्ट्यात उसाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. ऊस उत्पादकांना महापुराचा फटका बसत असल्याने त्याऐवजी अन्य पिकांचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने काहीएक अभ्यासपूर्वक नियोजनबद्ध पावले पडत आहेत. याबाबत शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने पीक पद्धती बदलण्यासाठी राज्यातील कृषी शास्त्रज्ञ, अभ्यासक व माजी कुलगुरू अशा मान्यवरांनी संवाद साधला आहे. व्यापक चर्चासत्राचे आयोजन केले गेले आहे. पूरबाधित क्षेत्रात टिकाव धरू शकणाऱ्या पिकांवर विशेष संशोधन करण्यावर भर दिला असून नव्या बदलाची पाऊलवाट उजळत आहे.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
man and his son stabbed young man for a trivial reason
नागपुरात २१ दिवसांत १५ हत्याकांड! क्षुल्लक कारणावरून बापलेकाने युवकाला भोसकले
Impact on hearing due to noise pollution during Ganoshotsav Pune-based lawyer in High Court
मुंबई : गणोशोत्सवातील ध्वनीप्रदूषणामुळे श्रवणयंत्रणेवर परिणाम, पुणेस्थित वकिलाची उच्च न्यायालयात धाव

यंदाच्या महापुराने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला चांगलाच हादरा दिला. अल्पकाळात झालेल्या अतिवृष्टीने महापूर येऊन मालमत्तेची मोठी हानी झाली. शेती-शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तर अंतच नाही. पश्चिाम महाराष्ट्र दोन लाख हेक्टर उसाला बाधा पोहोचून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खरे तर या भागाला महापूर हा काही नवीन नाही. दरवर्षी सातत्याने येणाऱ्या महापुरातून काही शिकायचे की नाही? हा कळीचा मुद्दा आहे. यासाठी शास्त्रोक्त विचार आणि लोकप्रबोधन याची गरज निर्माण झाली आहे.

महापूर आला. घर-शेतीवाडीचे नुकसान झाले. शासकीय पातळीवरून मदत मिळाली. नियोजनाच्या दृष्टीने शासकीय पातळीवर काही पावले टाकली गेली. हे दर वेळच्या महापुराचे साचेबद्ध चित्र. पण एवढ्यावर मर्यादित राहून चालणार नाही. महापुरापासून होणारे शेतीचे नुकसान लक्षात घेऊन समाजासमोर काही कृतीशील उपक्रम ठेवण्याची वेळ आली आहे. आंदोलने, मोर्चे याही पलीकडे जाण्याची ही वेळ आहे. ही प्रयोगशीलता कृषीविषयी संवेदनशील असलेल्या श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी जपली आहे. खरे तर गणपतराव पाटील हे साखर कारखानदारीतील एक यशस्वी नाव. ऊस-साखरेचे अधिकाधिक उत्पन्न झाले पाहिजे यावर कोणाही साखर कारखानदारांचा कटाक्ष. पण नदीकाठच्या शेतकऱ्यांचे सातत्याने महापुरामुळे नुकसान होत असेल तर उसाची वहिवाट बदलून पर्यायी पिके घेण्याचा वेगळा आणि परंपरेचा मुरड घालणारा धाडसी, दिशादर्शक निर्णय त्यांनी घेतला आहे. यासाठीच त्यांनी दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, कृषी विद्यापीठ, कृषी शास्त्रज्ञ, कोल्हापुरातील ऊस व गूळ संशोधन केंद्र अशा विविध क्षेत्रांतील कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञांना निमंत्रित करून पूर्ण दिवसभराचे विचार मंथन घडवून आणले. पर्याय पिकाचा आधार घेऊन शेतकरी जगला पाहिजे या भूमिकेचा त्यांनी पुरस्कार केला आहे. एखादा साखर उद्योगातील प्रमुखच असा सुधारणावादी विचार बोलून दाखवतो. त्यादृष्टीने पावले टाकू लागतो. तेव्हा हे पाहून आश्चार्य वाटल्यावाचून राहत नाही. यंदाच्या महापुराचे कारण मीमांसा करताना जागतिक हवामानातील बदल हा घटक महत्त्वाचा असल्याचे दिसून आले आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस सातत्याने येत राहील असेही हवामान, पर्यावरण अभ्यासक सांगत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे धोके हे आगामी काळात सातत्याने येत राहण्याची चिन्हे आहेत. पण हे होत राहिले त्याचा सर्वात मोठा फटका बसणार तो शेती आणि शेतकरी यांना. त्यामुळे या बदलत्या परिस्थितीकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. ‘ऊस एके ऊस’ असे एकच पीक पद्धती घेण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणे हवामान पद्धतीने अपरिहार्य बनले झाले आहे. परिणामी दत्त साखर कारखान्याचे चर्चासत्र महापूर भागातील शेतीला मार्गदर्शक ठरले.

फळशेतीचा पर्याय

महापुरात ऊस आठ-पंधरा दिवस पाण्याखाली जातो. काही ठिकाणी तो चक्क कुजून जातो. उसाच्या सुरळीत पाणी गेले की त्यांची वाढ खुंटते. हमखास उत्पन्न देणारे ऊसपीक शेतातून काढून टाकणेही शेतकऱ्याच्या आर्थिक कुवतीबाहेरचे होऊन बसते. त्यामुळे सतत महापुराचा धोका असलेल्या आणि पाच ते पंधरा फूट उंच इतके पाणी साचणाऱ्या नदीकाठच्या भागात उसाऐवजी फळपीक घेणे रास्त ठरेल, असे अभ्यासकांचे मत. त्यासाठी आंबा, चिकू यासह अन्य काही पिकांच्या लागवडीचा पर्याय अभ्यासकांनी सुचविलेला आहे. महापुरामुळे होणारे पूर्ण आर्थिक नुकसान टाळता येईल. फळांच्या पर्यायी पिकातून उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल; हा या मागचा विचार. सततच्या महापुराने नुकसान सोसून हवालदिल झालेले काही गावातील शेतकरीही यासाठी तयार झाले आहेत. याशिवाय राज्यात फारसे न पिकणारे पण उत्तर भारतातील महापुराच्या पट्ट्यात घेतले जाणारे ‘लिची’ सारखे फळाचे उत्पादन घेण्याचा विचार पुढे आला आहे. बिहार राज्यातील मुजफ्फरनगर या जिल्ह्यात ‘लिची’चे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. तेथेही पश्चिाम महाराष्ट्राप्रमाणे महापुराचा फटका सातत्याने बसत असतो. तेथील शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून ‘लिची’चा स्वीकार मोठ्या प्रमाणात केला आहे. जगातील द्वितीय दुसऱ्या क्रमांकाचा ‘लिची’ उत्पादक देश म्हणून भारताचा लौकिक निर्माण झाला आहे. जगभर ‘लिची’ला मोठी मागणी आहे. पाणी अधिक काळ ग्रहण करण्याची क्षमता पिकांमध्ये आहे. हाच जमेचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून कृष्णा-पंचगंगा काठी लिची उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. याच बरोबर शर्कराकंद (बीट) या पिकाचा विचार केला जात आहे. यासाठी कच्च्या, मध्यम व सुपीक अशा तीन पद्धतीच्या जमिनीमध्ये शर्कराकंद घेतले जाणार आहे. महापूर ओसरल्यानंतर ऑगस्टमध्ये लावण करायची आणि फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान पीक पक्व झाले की ते उसासोबत गाळप करायचे असे नियोजन आहे. या प्रयोगशीलतेसाठीही गणपतराव पाटील यांच्या प्रेरणेतून बरेच शेतकरी पुढे आले आहेत.

ऊस वाणांचा शोध

तीव्र महापुराच्या पट्ट्यात ऊस पीक नामशेष होण्याचा धोका वाढतो आहे. तर महापुराची तीव्रता कमी असलेल्या पट्ट्यात नव्या उसाच्या जाती शोधण्याचाही प्रयत्न केला जात आहे. काही उसाच्या वाणांचे संकर करून पुरात टिकणारी नवीन जात तयार करता येईल का असाही प्रयत्न केला जात आहे. याबाबत माजी कुलगुरू डॉ. योगेन्द्र नेरकर यांनी विदेशातील अद्ययावत कृषी संशोधनाचा दाखला देतात. ‘चिप्स (बटाट्याचे बारीक काप) बनवणाऱ्या कंपन्यांना एक अडचण जाणवत होती. बटाटे कापल्यानंतर ते काही काळाने काळे पडत. त्यापासून उत्पादित चिप्सला ही काळपट रंग येत असे. त्यामुळे ग्राहक अशा चिप्सना नाक मुरडत असत. ही बाब चिप्स उद्योजकांनी कृषी संशोधकांना सांगितली. त्यावर त्यांनी अशा बटाट्याचा वाण संशोधित केला की बटाटा कापल्यानंतरही त्याचे काप काळे पडत नाहीत. अशाच पद्धतीने महापुरात दीर्घकाळ तग धरणारी नवी जात, वाण संशोधन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी विदेशातील अशा संस्थांशी संपर्क साधला पाहिजे. किंबहुना अशा पद्धतीचे अद्ययावत संशोधन करण्यासाठी कारखान्याच्यावतीने काही शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केले पाहिजे. यातून आपल्या हाती निश्चिातपणे काही लागू शकते’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ऑफ असोसिएशनच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने कृष्णा- पंचगंगा काठच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. प्राथमिक निष्कर्षानुसार ४१९, ७४०, २६५ हे जुने वाण महापुरात टिकत नाहीत. ८६०३२ वाण बऱ्यापैकी टिकते. कोल्हापूर गूळ संशोधन केंद्र, कोइमतूर येथील संशोधित काही वाण पाण्यात टिकतात असेही दिसून आले आहे. याही संशोधनाचा वापर करून महापुरात टिकणारे उसाचे वाण कोणते आहेत याचाही शोध घेण्याच्या दृष्टीने डॉ. मच्छिंद्र बोखारे, डॉ. बी. आय. पाटील, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, नेताजी पवार, आसाराम कापरे आदी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

उपक्रमशीलता बांधावर

‘महापुरात शेतीचे सर्वस्व नाहीसे होऊन निर्धन होण्याची वेळ येते. शेती कर्जाचे ओझे अंगावर बसते. सगळेच गमावण्यापेक्षा पर्यायी पिकांचा काही प्रमाणात स्वीकार केला. त्यापासून उत्पन्न मिळाले तरी शेतकऱ्यांना बराचसा आधार मिळेल. यातून पर्यायी पीक आणि नव्या ऊस जातींचे संशोधन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था, शास्त्रज्ञ यांच्याशी संवाद सुरू आहे. हे काम कष्ठ, परिश्रम आणि खर्चिक आहे; पण दीर्घकाळाच्या हिताचा विचार करून कृती कार्यक्रम राबविण्याची हीच ती वेळ आहे. आता केवळ गप्पा मारून चालणार नाही. थेट बांधावर उपक्रमशीलतेला सुरुवात केली पाहिजे; आम्ही ती करीत आहोत. गरजेनुसार आवश्यक तो निधीही खर्च केला जाणार आहे.’ असे गणपतराव पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

प्रयोगाची भूमी

दत्त साखर कारखान्याने साखर कारखानदारीमध्ये गुणवत्तेचे मानदंड निर्माण केले आहेत. कारखान्याला राष्ट्रीय- राज्य पातळीवरील मिळालेली पारितोषिकांची यादी पाहिली तरी त्याचा प्रत्यय येतो. पण पुरस्काराच्या जंजाळात न अडकता कृषी विषयक नानाविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर कारखान्याचा भर आहे. यासाठीच कमी खर्चात शाश्वात शेती, एकरी शंभर टन, दीडशे, दोनशे टन ऊस उत्पादन, एकात्मिक खत व्यवस्थापन, सेंद्रिय कर्ब वाढ, खतांचा नियोजनबद्ध वापर, ऊस पोकळ पडू नये यासाठी उपाययोजन, पांढरी मुळी कार्यक्षम ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना, रोग व किडीचे प्रमाण कमी करण्यासाठी खतांचे प्रमाण अशा विविध अंगाने कारखान्याच्या कृषी विभागाचे संशोधन सुरू असते. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, शेती अधिकारी दिलीप जाधव, माती परीक्षण अधिकारी ए. एस. पाटील प्रयत्नशील असतात. या सर्वांचा आढावा घेऊन त्याचे सुविहित नियोजन कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील करीत असतात. दत्त कारखान्याने क्षारपड जमीन सुधारणेचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेऊन ७ हजार एकर जमिनीत सुधारणा केली आहे. यातून शेतकऱ्यांच्या घरी पुन्हा एकदा अर्थगंगा वाहू लागली आहे. पण याही पलीकडे जाऊन महापुरात पर्यायी पीक आणि उसाचे सुधारित वाण काळ्या शिवारात कसे राबवता येतील याबाबत डॉ. योगेंद्र नेरकर, ज्येष्ठ मृदा शास्त्रज्ञ प्रा. अरुण मराठे, ऊस तज्ज्ञ सुरेश पवार, माजी प्राचार्य डॉ. पी. व्ही. पाटील, डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. भरत रासकर, डॉ. प्रीती देशमुख, सुधा घोडके, सुप्रिया कुसाळे, डॉ. बापूसाहेब गायकवाड, डॉ. विद्यासागर गेडाम, डॉ. अशोक पिसाळ आदी शास्त्रज्ञांनी नवी उमेद पेरण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे. त्यांनी सुचवलेल्या उपाययोजना कृष्णाकाठी नवा शेतीचा आशेचा अंकुर घेऊन उभा राहील अशी आश्वासक स्थिती निर्माण झाली आहे.

dayanand.lipare@expressindia.com