सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात माढा दौऱ्यावर आलेले राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना रविवारी आंदोलकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. माढा शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलकांनी सहकारमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका आंदोलकाने थेट मंत्र्यांच्या वाहनासमोर धाव घेतली, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध प्रलंबित मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ताफ्याला घेराव घातला.
माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनासाठी सहकारमंत्री पाटील माढ्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच काही अंतरावर पाठोपाठ या घटना घडल्या.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या उपोषणाचे तीव्र पडसाद या दौऱ्यात उमटले. सहकारमंत्र्यांचा ताफा जात असताना मराठा आंदोलक बापू गायकवाड यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत धावत्या वाहनाचा पाठलाग केला आणि थेट मंत्र्यांच्या गाडीसमोर आडवे जाण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तत्परता दाखवत गायकवाड यांना तात्काळ ताब्यात घेतले. काही वेळानंतर समज देऊन सोडण्यात आले.
शेतकऱ्यांनी मांडल्या मागण्या; मंत्र्यांकडून निवेदन स्वीकार
तत्पूर्वी, माढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सहकारमंत्र्यांची गाडी थेट रोखून धरली. उजनी धरण तालुक्यात असूनही टेल भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाण्याचे वितरण व्यवस्थित होत नसून ते तात्काळ टेल भागाला सोडावे, मनकर्णि तलावात पाणी सोडावे, थकीत शेतकऱ्यांना ‘एफआरपी’नुसार उसाचे बिल मिळावे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी २ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान, कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतः गाडीतून खाली उतरून संतप्त शेतकऱ्यांचे म्हणणे आणि मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या. शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारत यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी रस्ता मोकळा केला व त्यानंतर मंत्र्यांचा ताफा पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला.
