स्वीकृत नगरसेवकपदावरून नाराजीतून काँग्रेसच्या नगरसेविका रीना कांबळे यांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे राजीनामा दिला. विजय देसाई या कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली नसल्याने कांबळे यांनी राजीनामा दिला. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. संख्याबळानुसार या पक्षाला स्वीकृत नगरसेवकांच्या जागा मिळाल्या. या जागांवर तौफिक मुलाणी आणि मोहन सालपे यांची नावे निश्चित झाली. मात्र, काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक असल्याने नाराजी पसरली. फुलेवाडी रिंग रोडसह या परिसरातील काँग्रेसच्या ३ जागा आपण निवडून आणल्या, असा दावा करत देसाई यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी आग्रह धरला. पण, त्यांना हे पद दिले नाही. गेली पंधरा वष्रे देसाई हे सतेज पाटील यांच्याशी प्रामाणिक असूनही त्यांना डावलल्याने देसाई यांच्या समर्थकांनी सतेज पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली. देसाई यांना डावलल्याने कांबळे यांनी राजीनामा दिला आहे.