दयानंद लिपारे

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्र्यांवर शरसंधान केल्याने मविआ विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगणार असल्याचा दाखला मिळाला. त्याहीआधी विकासकामावरून दोन खासदारांमध्ये जुंपली आहे. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी ‘मी केलेल्या कामाचे श्रेय धनंजय महाडिक यांनी घेऊ नये,’ असे मत मांडले आहे. तर ‘दुसऱ्याच्या कामावर फोटोसेशन करायची मला सवय नाही, ‘ असा प्रतिटोला महाडिक यांनी लगावला आहे. केंद्र शासनातील विकासकामावरून दोन खासदार एकमेकाविरुद्ध उभे ठाकले असताना विमानतळासाठी प्रयत्न करणारे पालकमंत्री सतेज पाटील हेही या वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

 कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय संघर्ष सातत्याने चर्चेत राहिला आहे. महाडिक विरोधात प्रामुख्याने मंडलिक, सतेज पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पुन्हा एकदा खासदार बनलेले धनंजय महाडिक यांना नव्याने ऊर्जा मिळाली आहे. तर जिल्ह्यातील भाजपची ताकतही वाढल्याचा दावा करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आल्यावर जिल्ह्यातील मंत्र्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय मंडलिक यांना उद्देशून लगावला आहे. जिल्ह्याचा विकास रखडला असल्याने नूतन खासदार महाडिक यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

विकासकामावरून कलगीतुरा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक अशी दोन वेळा लढत होऊन सामना १-१ असा बरोबरीत राहिला आहे. पहिल्या लढतीत महाडिक यांनी बाजी मारली होती. तेव्हा त्यांनी विरोधी पक्षातील खासदार असतानाही केंद्र शासनाकडून मोठय़ा प्रमाणात निधी आणला. विमान, रेल्वेसेवा यांना गती मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचा दावा सातत्याने केला होता. त्यावरून त्यांना मंडलिक यांनी सदाशिवराव मंडलिक मार्ग नामकरण सोहळय़ात ‘कोल्हापूरसाठी कोटय़वधीचा निधी येईल असे वाटत होते. पण विमान अजून घिरटय़ाच घालत आहे. पर्यायी पूलही रखडलेला आहे. लोकप्रतिनिधीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत,’ अशी टीका केली होती. याच कार्यक्रमात सतेज पाटील यांनीही विकासकामाच्या मुद्दय़ावरून महाडिक यांच्यावर निशाणा साधला होता.

 कोल्हापूरला महापुराचा फटका सातत्याने बसत आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली जात असल्याने कोल्हापुरात वाहनांना प्रवेश मिळणे ही बिकट समस्या बनली आहे. याला पर्याय म्हणून महाडिक यांनी कोल्हापुरात बास्केट ब्रिज होण्यासाठी १६० कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केल्याचे सांगितले होते. त्यावर गतवर्षी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी बास्केट ब्रिज प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग मंडळ, राज्य रस्ते विकास मंडळ यांच्याकडे सादर झाला नाही. महाडिक या मुद्दय़ावरून जनतेच्या डोळय़ात धूळफेक करीत आहेत, असा आरोप केला होता. मंडलिक यांनी कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र परिपूर्ण आराखडा सादर करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. याचा समाचार घेताना महाडिक यांनी बास्केट ब्रिजला केवळ मंजुरीच नाही तर निविदाही मिळाली होती. हे काम पूर्ण करायला माझे पहिले प्राधान्य राहील, असे पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे या प्रश्नावरून महाडिक – मंडलिक या दोन खासदारांतील वादाचा पूल रंगत राहण्याची चिन्हे आहेत.

रेल्वे, विमान वादाचे कारण

  • कोल्हापुरातील खासदारांकडून प्रामुख्याने केंद्र शासनाकडून विमान, रेल्वे, कामगार विमा रुग्णालय यासाठी पाठपुरावा केला जातो. गेल्या महिन्यात पालकमंत्री सतेज पाटील यांनी विमानतळाच्या भूसंपादनासाठी २१२ कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली होती.
  • मंडलिक यांनी विमानतळाचे नाइट लँिडग, भूमिसंपादन यासाठी २५० कोटीचा निधी मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. खंडित झालेली मुंबई बेंगलोर विमानसेवा पूर्ववत सुरू होणार आहे. नवीन रेल्वे गाडय़ांना मंजुरी मिळणार आहे. ईएसआय रुग्णालय सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. हॉकी स्टेडियमसाठी केंद्र शासनाने ५ कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी प्रमुख कामांची यादी वाचून दाखवली आहे. त्यावर महाडिक यांनी ‘ मी मंजूर करून आणलेल्या  विकासकामाचे उद्घाटन मंडलिक व इतर मंडळी करत आहेत. पाचपैकी एकच विमानसेवा सुरू आहे.
  • आठ रेल्वे गाडय़ा सुरू केल्या होत्या; त्याही बंद आहेत; याचे अपश्रेय कोणाचे? असे म्हणत त्यांनी मंडलिक यांच्यावर टीका केली आहे. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस होण्याच्या आतच लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांमध्ये वाद-विवादाला फोडणी मिळाली आहे. त्यामध्ये पालक मंत्रीही जोडले जाणार असल्याने आता विकासकामांचा वाद पुढील काळात चिघळत राहण्याची ही जणू नांदी ठरली आहे.