दयानंद लिपारे
कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुरातील कोणत्या उमेदवाराच्या गळय़ात खासदारकीची माळ पडणार याची उत्सुकता सकाळपासूनच कोल्हापूरकरांना लागली होती. सायंकाळपर्यंत मतदान मोजणीचा कल जाहीर झाला की जल्लोषाची तयारी महा विकास आघाडी व भाजप या दोन्हीकडून केली होती. मात्र मतमोजणी लांबल्याने अनेकांचा विरस झाला.

राज्यसभेच्या सहाव्या जागेची लढत ही प्रामुख्याने शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि भाजपचे राज्य उपाध्यक्ष, माजी खासदार धनंजय महाडिक या दोघा कोल्हापूरच्या उमेदवारांमध्ये रंगत आहे. यामुळे दोघांच्या समर्थकांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हालचाली सुरू ठेवल्या होत्या. तर आज मतमोजणी होऊन निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता सकाळपासूनच कोल्हापूरकरांना लागली होती. टीव्हीवरील बातम्या, समाज माध्यमातून व्यक्त होणारे अंदाज याकडे सर्वाचे डोळे लागले होते. संजय पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी व मुलीने करवीर निवासिनी महालक्ष्मीची पूजा करून यश लाभू दे अशी प्रार्थना केली. धनंजय महाडिक मुलांसह सपत्नीक मुंबई होते.

निकाल लांबल्याने हुरहूर
दरम्यान, मतमोजणी मतदान झाल्यानंतर महा विकास आघाडी व भाजप यांच्याकडून काही आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आले. हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कक्षेत गेला. तेथून येणाऱ्या निर्णयाची प्रतीक्षा रात्री आठ वाजल्यापासून कोल्हापूरकर करत होते. मात्र याबाबत कोणता सुगावा लागत नसल्याने त्यांची हुरहूर अधिकच वाढीस लागली होती.