कोल्हापूर : गगनाला भिडलेले कापूस दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र शासनाने कापूस आयातीवरील सीमा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असताना केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे अडचणीत आलेल्या वस्त्रोद्योगाला हा निर्णय फायदेशीर ठरेल, अशा प्रतिक्रिया देशभर उमटत आहे. निर्यात वृद्धीसाठीही याचा लाभ होणार आहे. कापूस सट्टा बाजाराला नियंत्रण बसवले जावे अशीही मागणी होत आहे.

या हंगामात कापसाच्या दराने गगनभेदी झेप घेतली आहे. गेल्यावर्षी पावसामुळे कापूस पीक मोठय़ा प्रमाणात खराब झाले. गेल्या सहा महिन्यात कापूस साठय़ाचे प्रमाण ३६० लाख गाठी वरून ३३० लाख गाठीवर आले. गरजेपेक्षा पुरवठा कमी पडत असल्याने गेल्या तीन महिन्यात प्रति खंडी ( ३५६ किलो) कापसाचा दर ७० हजार रुपये वरून ९० हजार रुपयांवर वधारला आहे.

देशातील विविध संघटनांनी केंद्र शासनाकडे कापूस आयात करण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र शासनाने कापसावर दहा टक्के सीमा शुल्क आकारणीचा निर्णय मागे घेतल्याने तुलनेने स्वस्तातील कापूस उपलब्ध होणार असल्याने वस्त्रोद्योगात स्वागत केले जात आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाइल इंडस्ट्रीचे (सिटी) व  सौदर्न इंडिया मिल्स असोसिएशनचे (सीमा) अध्यक्ष रवी राम, नोथर्ण  इंडिया टेक्स्टाईल मिल्स असोसिएशन (नीटमा) चे अध्यक्ष संजय गर्ग, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष ए. शक्तीवेल आदींनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

वस्त्रोद्योगाला चालना

कापसाच्या आयातीवर पूर्वी पाच टक्के सीमाशुल्क आणि पाच टक्के अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट कर आकारण्यात येत होता. हे निर्बंध हटवले असल्याने त्याचा वस्त्र उद्योजकांसह ग्राहकांनाही फायदा होईल, असे ए. शक्तीवेल यांनी नमूद केले आहे. ‘पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्स्पोर्ट प्रमोशनल कॉऊन्सिल’चे संचालक, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष, वस्त्र उद्योजक राजू राठी म्हणाले, की भारतातील कापूस दरामध्ये कमालीची वाढ झाल्याने वस्त्रोद्योगाचे गणित बिघडले होते. सोलापूर चादरसाठी लागणारे २० सिंगल सूत १८० रुपये वरून ३२४ रुपये किलो इतके वाढले. परिणामी देशातील आणि निर्यात मागणीवर परिणाम झाला आहे. आता केंद्र शासनाने ३० लाख गाठी कापूस आयात करण्याचा निर्णय घेतल्याने स्वस्त कापूस उपलब्ध होऊन निर्यात आणि रोजगार निर्मितीत वाढ होणार आहे ‘, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘द कॉटन टेक्स्टाईल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’चे अध्यक्ष मनोज कुमार पटोडिया (मुंबई) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे अभिनंदन करून कापसाची असह्य ठरलेली दरवाढ रोखली जाऊन निर्यात वृद्धीस लाभ होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. इचलकरंजीतील अरिवद कॉटसीन इंडियाचे चालक श्यामसुंदर मर्दा यांनी केंद्र शासनाने वस्त्र उद्योजकांना गुढीपाडव्याची उद्योग प्रगती उंचावणारी भेट दिली असल्याचे नमूद केले.

 सट्टा बाजार तेजीत

कापसावरील आयात कर कमी करण्याचा निर्णय झाला असला तरी सट्टा बाजार तेजीत असल्याने याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत विटा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष किरण तारळेकर म्हणाले, की कापूस आयात कर कमी करण्याचा निर्णय झाल्यावर आंतरराष्ट्रीय बाजारात १४१.५१ डॉलर (८५ हजार रुपये खंडी) असलेला दर काही काळातच १४४.७८ डॉलर (८७ हजार रुपये खंडी) पर्यंत गेला. सतत बदलत्या बाजारामुळे कापूस, सूत बाजाराची स्थिरता संपुष्टात येऊन वस्त्रोद्योगाला आलेले जुगाराचे स्वरूप रोखण्यासाठी पावले उचलण्याची मागणीही त्यांनी केली.