Sunetra Pawar Satara Visit: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आज (०२ फेब्रुवारी) सातारा दौऱ्यावर जाणार आहेत. सुनेत्रा पवार कराडमध्ये प्रितीसंगम बाग येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर फलटणमध्ये अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दौरा आहे.
असा असेल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सातारा दौरा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी दहा वाजता कराड येथील प्रितीसंगम बाग येथे दाखल होतील. पवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी त्यांना पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करतील. अकरा वाजता सुनेत्रा पवार फलटणकडे रवाना होतील. दुपारी एक वाजता त्या अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतील. मूळचे लोणंद, तरडगावचे असणारे विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. यानंतर पवार बारामतीला रवाना होतील, अशी माहिती समोर आली आहे.
विमान अपघातात चार जणांचा मृत्यू
बारामती येथे झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह इतर चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील क्रूमध्ये कॅप्टन सुमित कपूर, को – पायलट शांभवी पाठक, अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचेही निधन झाले आहे. अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांपैकी पिंकी माळी, विदीप जाधव यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विदीप जाधव यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. विदीप यांच्यावर २९ जानेवारी रोजी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. “दादांच्या निधनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे”, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या. “अजित पवारांच्या विचाराचा वारसा पुढे नेत शिव – शाहू – फुले- आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरश: भरुन येत आहे”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.
मोदी, शाह आणि फडणवीसांकडून शुभेच्छा
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरु करणाऱ्या सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा”, अशा शुभेच्या मोदी आणि शाह यांनी दिल्या. तर, सुनेत्रा पवार अजितदादांचा वारसा समर्थपणे चालवतील असा विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले.

