इचलकरंजी येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील वे ब्रीजसमोर ट्रॅक्टर ट्रॉलीमधील वैरण अंगावर पडून त्या खाली सापडल्याने मेघा (वय अडीच वष्रे) या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबतची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे.
पार्वती औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या वे ब्रीजसमोर गुजरात येथील दुडानील हे कुटुंबीयांसमवेत तंबू मारून वास्तव्यास आहेत. त्यांचा गोपालनाचा व्यवसाय असून, वैरण आणण्यासाठी त्यांची स्वत:ची ट्रॅक्टर ट्रॉली आहे. मंगळवारी ट्रॅक्टर ट्रॉलीतून वैरण घेऊन आले. तंबूसमोर ट्रॅक्टर उभा करून ते जेवणासाठी गेले होते. ट्रॉलीजवळ त्यांच्या कुटुंबातील लहान मुले खेळत होती. या वेळी अचानक ट्रॉलीतील वैरण अंगावर पडल्याने मेघा वैरणीच्या ढिगाऱ्याखाली सापडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची वर्दी तिचे वडील लालजी दुडानील (मूळ गाव सुरेंद्रनगर, गुजरात, सध्या रा. यड्राव) यांनी शहापूर पोलिसात दिली आहे. अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.