कोल्हापूर : नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनावेळी दगडफेक करण्यात आली होती. त्यातील प्रत्येक दगड पोलिसांनी संकलित केले आहेत. त्यावरील बोटांचे ठसे ( फिंगरप्रिंट्स ) लवकरच ‘आधार’ कार्डशी जोडले जाणार आहेत. त्याआधारे तपास केला जाणार आहे, असे विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीचा उल्लेख करत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी दिल्ली येथील या आंदोलनाबाबत पोलिसांनी अत्यंत धक्कादायक तितकाच विस्तृत अहवाल तयार केला आहे. तो पाहिल्यास कोणालाही चक्कर येईल, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार सर्वांना आहे. केलेले आरोप खरेच असतात असे नाही. दिल्ली पोलिसांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आंदोलनाचे सखोल विश्लेषण केले आहे. जे आंदोलक ताब्यात घेतले गेले आहेत, त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड आणि आंदोलनामागील खरा हेतू आता स्पष्ट झाला आहे. राहुल गांधी यांनी लाठीहल्ल्याचे आरोप केले असले, तरी आता पोलिसांच्या पुराव्यांसमोर त्यांना स्वतःचे दावे सिद्ध करावे लागतील, असे आव्हान त्यांनी दिले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणकारी योजनांचीही माहिती दिली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचा लाभ मिळत आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार १८ शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार असून, २ लाखांच्या मर्यादेतील सर्व थकबाकी माफ केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच ४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकी माफ करून राज्य सरकारने बळीराजाला मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढल्याचा दावा त्यांनी केला.

नीट’ परीक्षेच्या मुद्द्यावर बोलताना विरोधकांकडून केवळ राजकारण सुरू असल्याची टीका केली. तसेच इचलकरंजी भाजपमधील अंतर्गत वाद हा केवळ “पेल्यातील वादळ” असल्याचे स्पष्ट करत लवकरच समन्वय समितीच्या माध्यमातून त्यावर मार्ग काढला जाईल, असे सांगितले.आंदोलनाबाबत बोलताना पाटील यांनी सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्रालयाने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले. या आंदोलनाला परदेशातून मदत मिळत असल्याची आणि काही समाजकंटक यात घुसल्याची खात्रीशीर माहिती सरकारकडे होती, असे त्यांनी सांगितले. जोपर्यंत आंदोलक संसदेच्या दिशेने निघाले नाहीत, तोपर्यंत प्रशासनाने संयम बाळगून त्यांना रोखले होते. जर हे आंदोलक संसदेत घुसले असते, तर देशाची स्थिती काय झाली असती, याचा विचार विरोधकांनी करावा, असे ते म्हणाले.