पोलीस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील पायाभूत विकासाच्या कामात चालणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल गुरुवारी भाजपने चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे महापालिका ठेकेदारांच्या समूहातील समाज माध्यमातील संदेशाची प्रत सादर केली आहे.

भाजपचे प्रवक्ते, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, हेमंत आराध्ये, राजू मोरे, अजित सूर्यवंशी, विजयसिंह खाडे पाटील यांनी आज बलकवडे यांची भेट घेऊन चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.

त्यामध्ये म्हटले आहे,की महापालिकेच्या ठेकेदारांच्या समाज माध्यमात एका सदस्याने ‘पक्षाकडून आलेल्या निधीतून ज्यांना काम मिळाले आहे त्यांनी जे ठरले आहे त्याप्रमाणे दोन दिवसात पूर्ण करावे. लवकर पूर्ण करील त्याला पुढे कामे मिळतील. जास्त लांबड लावायचे नाही,’ असे हस्तलिखित पत्र अग्रेषित केले आहे. त्यावर काहींनी संमतीदर्शक इमोजी दिले आहेत. तर एका ठेकेदाराने रडणारी इमोजी अग्रेषित करून ‘म्हणजे परत १८  टक्के का’ अशी विचारणा केली आहे. शासकीय व महापालिकेचे जमा होणारा निधी हा करदात्यांच्या पैशातून आलेला असल्याने जबाबदारीने कामे होणे अपेक्षित आहे. समाज माध्यमातील या संदेशातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रतीत होते.

कामाचा ठेका दिला म्हणून जे काही द्यावयाचे ते कोणास मिळणार, काम देणारा कोण, प्रशासनाची भूमिका कोणती, ज्या पक्षाचे नाव आहे त्या प्रमुखांना ते पैसे मिळणार का असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. बारा कोटीची कामे होणार असून त्यात १८ टक्के म्हणजे सव्वा कोटी रुपये पैसे ठेकेदारांकडून कोण काढून घेणार आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे.