कोल्हापूर : दिवाळीची सुरुवात ‘वसुबारस’ या सणाने होते. हा दिवस पूर्णपणे देशी गाईला समर्पित असतो. देशी गाय केवळ दूध देत नाही, तर तिचे गोमूत्र आणि शेणही आरोग्यासाठी व शेतीसाठी अमृत मानले जाते. तिच्यातील वात्सल्य आणि कृतज्ञतेपोटी या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. भारतातील २० व्या पशुधन जनगणनेनुसार देशी/स्थानिक गोवंशाची एकूण संख्या १४.२१ कोटी इतकी आहे. त्याची आर्थिक उलाढाल वाढत आहे. देशी गायींपासून मिळणाऱ्या विविध घटकांमुळे ग्रामीण भागात एक मोठी आर्थिक परिसंस्था तयार झाल्याचे पाहायला मिळते. भारत सरकारने देशी गायींच्या संवर्धनासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. असे असले तरी पारंपारिक पद्धतीने देशी गायी पाळणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक व्यवहार्य अडचणींचा सामना करावा लागतो. हे चित्र बदलणे पशुपालकांसाठी अत्यंत गरजेचे आहे.
भारतीय संस्कृती आणि सण-उत्सवांमध्ये जनावरांना देवतांचे रूप मानून कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. मानवी जीवनाचा आधार असलेल्या मुक्या प्राण्यांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी काही खास सण साजरे केले जातात. ‘पोळा’ हा सण शेतकऱ्याचा सख्खा सोबती असलेल्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. निसर्गाचा समतोल राखणाऱ्या आणि पिकांचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागाला भारतीय संस्कृतीने पूजनीय मानले आहे. भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते. या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. देशी गाय (कामधेनु) केवळ दूध देत नाही, तर तिचे गोमूत्र आणि शेणही आरोग्यासाठी व शेतीसाठी अमृत मानणारा एक वर्ग आहे.
देशातील सर्वोच्च स्थावरील सत्ताधीशांनी गेल्या काही वर्षात देशी गाय संगोपनाला प्रोसाहन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी नानाविध योजना जाहीर केल्या आहेत. कृषी संस्कृतीत गाईच्या अस्तित्वाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. इतकेच काय तर राजकारणातील काऊ बेल्ट हि संकल्पनाही काही पक्षाच्या पथ्यावर पडणारी आहे. गोवंश पट्टाही संकल्पना उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड , हरियाणा येथे महत्वपूर्ण ठरली आहे. या भागातील संस्कृती, समाजकारण आणि राजकारणावर गाय, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि हिंदू धार्मिक भावनांचा मोठा प्रभाव असल्याने राजकीय विश्लेषक या भागाला ‘काऊ बेल्ट’ असे संबोधतात, हा त्यातील आणखी एक विशेष पैलू.
भारतातील २०१२ च्या जनगणनेत देशी गोवंशाची संख्या १५.१७ कोटी होती, जी २० व्या पशुधन जनगणनेनुसार (२०१९) मध्ये ६ टक्क्यांनी घसरून १४.२१ कोटी झाली आहे. दूध उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गायींच्या जातींमध्ये पुढील गायींचा समावेश केला जातो. गुजरातच्या गीर वनप्रदेशातून उगम पावलेली गीर गाय, ही लोकप्रिय जातींपैकी एक आहे. दिवसाला २० लिटरपर्यंत दूध देऊ शकतात, पण सरासरी दूध प्रमाण १२ ते १५ लिटरच्या दरम्यान असते. गीर दूध खूप लोकप्रिय आहे. पंजाब प्रांतातील साहिवाल ही प्रसिद्ध जात आहे. दररोज ८ ते १० लिटर दूध मिळू शकते . काही गायी त्याहूनही जास्त दूध देऊ शकतात. लोकप्रिय जात म्हणजे रेड सिंधी गाय. मूळतः सिंध प्रांतात (आता पाकिस्तानात) विकसित झालेली .सरासरी ८-१० लिटर दूध देतात. उच्च प्रजनन दरासाठीही त्या ओळखल्या जातात.
राजस्थानच्या थार वाळवंटावरून नाव मिळालेली थारपारकर जात, दूध देण्याच्या क्षमतेसाठी, ओढकामासाठी वापरली जाण्यासाठी प्रसिद्ध आहे.रोजचे दूध सरासरी ८-१२ लिटर असते. मराठवाडा प्रदेशातील स्थानिक बहुपयोगी जात म्हणजे देवणी. दररोज ८-१० लिटर दूध देतात. या दुधात चरबी आणि प्रथिनांचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते अनेक प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांसाठी उपयुक्त ठरते. या जातीचा कणखर स्वभाव आणि आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेते.राजस्थानच्या कोरड्या प्रदेशात विकसित झालेली राठी गाय दिवसाला ६-८ लिटर दूध देते. उत्तर भारतातील जात ‘ हरियाणा’ आहे. दिवसाला ६ ते ८ लिटर दूध देते. आंध्र प्रदेशातील ओंगोले जात, तिच्या सहनशक्ती, ताकदीसाठी ओळखली जाते. सरासरी ६ ते ८ लिटर दूध मिळते.
देशी गायीचे दूध प्रसिद्ध पावण्याची काही कारणे दिसून येतात. भारतीय देशी गायींच्या दुधात ए२ बीटा-कॅसिन नावाचे विशेष प्रोटीन असते. हे दूध पचायला खूप सोपे जाते. पोट फुगणे, गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होत नाही. ‘प्रोलिन’ नावाचे अमिनो ॲसिड आणि पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. गेल्या काही वर्षांत देशी गाईच्या ए२ दुधाला मोठी मागणी आल्यामुळे बाजारातील किंमत प्रति लिटर 8० ते 123 रुपये पर्यंत पोहोचली आहे.भारतात केवळ गोमूत्र आणि शेणाच्या योग्य प्रक्रियेतून व विक्रीतून १,४९,१८० कोटींची संभाव्य चक्राकार अर्थव्यवस्था तयार होऊ शकते. गोवर्धन योजनेच्या माध्यमातून शेणापासून बायोगॅस आणि सेंद्रिय खत तयार करून पशुपालकांना वार्षिक १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचाप्रसार वाढल्याने देशी गाईचे शेण आणि गोमूत्र (जीवामृत, घनामृत) बाजारात चांगल्या किमतीला विकले जात आहे.
गाय शेण एक समृद्ध सेंद्रिय खत आहे. गोमूत्रामध्ये औषधी गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. ते कीटकनाशक म्हणूनही काम करत असल्याचे म्हणणारा वर्ग आहे.
काळाच्या ओघात देशी गायीचे अस्तित्व या ना त्या कारणाने कमी होत गेले. गाईची उपयुक्तता केवळ दुधापुरती मर्यादित राहिली. रासायनिक खते , एलपीजीचा वापर सुरू झाला. कालांतराने गोमूत्राची मागणी कमी झाली. लहान मुलांसाठी गाईच्या दुधावरील अवलंबित्वही कमी झाले. परिणामी, आर्थिक महत्त्वाबरोबरच गाईचे महत्त्व कमी झाले. गायी भाकड काळात , म्हातारपणी मालकांवर ओझे बनल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले.निवडक राज्य सरकारे भाकड गायींच्या देखभालीसाठी काही प्रमाणात( खरे तर सहसा तुटपुंजी) आर्थिक मदत देतात. दुग्धव्यवसाय मालकांना स्वतःची, त्यांच्या गायींची काळजी स्वतःच घ्यावी लागते. दूध,दुग्ध विकास महासंघ,संघटना नियमितपणे दूध खरेदी करून आर्थिक मदत पुरवतात. आर्थिक भार कमी करण्यासाठी भाकड आणि वृद्ध गायींची गुपचूप विक्री केली जाते, त्यांची विल्हेवाट लावली जाते असे वृत्त आहे.
भारत सरकारने देशी गायींच्या संवर्धनासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय गोकुळ मिशनदेशीसुरु केलेलं असून गायींच्या प्रजातींचे संवर्धन, अनुवांशिक सुधारणा आणि दूध उत्पादकता वाढवण्यासाठी ३,४०० कोटींच्या निधीसह ही योजना कार्यरत आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन २,४८१ कोटींच्या निधीसह सुरू असलेल्या या योजनेद्वारे देशी गायींच्या शेण-गोमूत्रावर आधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. तथापि या योजनांचा लाभ थेट पशुपालक वर्गपर्यंत जाताना अनेक अडथळे असल्याचे दिसते.
दुसरीकडे , सरकारी पाठबळ मिळत असले तरी देश गाय संगोपन हे खूप जिकिरीचे बनले आहे. त्याची अनेक कारणे दिसतात. विदेशी किंवा संकरित गायींच्या तुलनेत देशी गायींची सरासरी दूध उत्पादकता कमी आहे. देशी गायींचे प्रमाण एकूण दुभत्या जनावरांमध्ये ४० टक्के असले, तरी एकूण दूध उत्पादनात त्यांचा वाटा केवळ २१ टक्के आहे.भारतातील एकूण दूध उत्पादनापैकी केवळ १२-१४टक्के दूध सहकारी संस्था किंवा कंपन्या या संघटित क्षेत्राद्वारे गोळा केले जाते. उर्वरित मोठा भाग हा असंघटित बाजारपेठेत विकला जात असल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.देशात गरजेच्या तुलनेत पशुवैद्यांची मोठी कमतरता आहे. तसेच खुरकुत आणि ब्लॅक क्वार्टर सारख्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. एका अभ्यासानुसार, संकरित गायीपासून दररोज ७२.०८ रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, तर पारंपारिक/देशी गायीच्या देखभालीचा खर्च उत्पादनापेक्षा जास्त असल्याने अनेकदा शेतकऱ्याला नाममात्र किंवा नकारात्मक परतावा मिळतो. गायीचा दुग्धकाळ संपल्यानंतर किंवा म्हातारपणात तिचा सांभाळ करण्याचा खर्च दररोज मोठा खर्च येतो. अनेक राज्यांमध्ये गोवंश कत्तल बंदी आणि कडक नियमांमुळे शेतकरी अनुत्पादक जनावरे किंवा बैल विकू शकत नसल्याने ते शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक ओझे बनले आहे.
या क्षेत्राच्या दीर्घकालीन उत्पादकतेसाठी रोग व्यवस्थापन हे केंद्रस्थानी आहे. पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, २०३० पर्यंत या रोगांचे निर्मूलन करण्याच्या उद्दिष्टाने, पशुधनाला लाळ्या-खुरकूत रोग आणि ब्रुसेलोसिस यांसारख्या रोगांविरुद्ध मोफत लसी पुरवल्या जातात. या कार्यक्रमाने रोगांमुळे होणारे नुकसान लक्षणीयरीत्या कमी केले आहे. तरीही, पशुपालनासाठी लागणारा मानवी श्रम आणि मजुरीचा वाढता खर्च लहान शेतकऱ्यांच्या बजेटच्या बाहेर जात आहे. आजच्या आधुनिक काळात गायींना पूजनीय मानणारा वर्ग असला , त्याचे अनेक फायदे असल्याचा त्यांचा दावा असलेला तरी गोपालक मात्र संगोपनाच्या ओझ्याखाली दाबत चालल्याचे चित्र आहे. त्याचे रुदन ऐकायला हवे. हि ‘ कामधेनु ‘ खऱ्या अर्थाने ‘ अर्थधेनु ‘ झाली तरच गोपालकांच्या जीवनात कपिलाषष्ठीचा योग आला असे म्हणण्यास जागा उरेल.
