कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकासकामांचे लोकार्पण रविवारी (९ ऑगस्ट ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि विविध विभागांतील समन्वयाची तयारी तपासण्यासाठी शनिवार, ८ ऑगस्ट रोजी रुग्णालय परिसरात विशेष वाहतूक नियंत्रण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवार दुपारपासून कार्यक्रम संपेपर्यंत शासकीय वाहनांव्यतिरिक्त सर्व खाजगी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना रुग्णालय परिसरात प्रवेश बंद राहणार आहे.
रुग्णसेवा अखंडीत
कोणत्याही परिस्थितीत रुग्णसेवा बाधित होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस, सुरक्षा व इतर आपत्कालीन सेवांची वाहने, कार्यक्रमासाठी अधिकृत परवानाधारक (पासधारक) शासकीय वाहने तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.
सहकार्याचे आवाहन
रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी रुग्णालय परिसरात येताना वाहतूक नियंत्रणाच्या सूचनांचे पालन करावे, शक्यतो पर्यायी वाहतूक व्यवस्था वापरावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी केले आहे.
हसन मुश्रीफांचे प्रयत्न
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकासकामांसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) सुमारे २५० कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा कायापालट करण्यात आला आहे. या सुधारणांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना महानगरांच्या धर्तीवर दर्जेदार उपचार मिळू लागले आहेत. मुख्य हेरिटेज इमारतीसह दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी आणि सरस्वती इमारतींचे नूतनीकरण. ८ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, ३० बेडचा मॉड्यूलर अपघात विभाग, आणि १५ बेडचे डायलिसिस व अतिदक्षता विभाग.काँक्रीट रस्ते आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी १६ शेडची निर्मिती आदी कामे झाली आहेत.
