कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेले भाषण उपस्थितांच्या मनाचा ताबा घेणारे, स्मरणात राहणारे ठरले. कोल्हापूरच्या मातीतील अस्मिता, खाद्यसंस्कृती, खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव करत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दिलखुलास संवादाने उपस्थितांची मने जिंकली. कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापुरात आले होते. लोकार्पणाचे कार्यक्रम संपल्यानंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह समोर झालेल्या जाहीर कार्यक्रमा वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले फर्डे भाषण उल्लेखनीय ठरले.

तेव्हा मिसळ आज तांबडा पांढरा

भाषणाची सुरुवात करताना त्यांनी कोल्हापूरच्या प्रसिद्ध तांबड्या आणि पांढऱ्या रस्शाची आठवण काढताच संपूर्ण सभागृहात आनंदाची लकेर उमटली. कोल्हापूर महापालिका निवडणुकी वेळी त्यांनी कोल्हापूरच्या प्रसिद्ध मिसळचा आस्वाद घेतला होता. तर आज त्यांनी तांबड्या पांढऱ्याची आठवण काढली.​

कोल्हापुरातील मेस्सी!

कोल्हापूरच्या क्रीडा संस्कृतीचा विशेष उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, या मातीत खेळाविषयी विलक्षण वेडेपणा आहे. एकीकडे फिफा विश्वचषक स्पर्धेत फुटबॉलचा जादूगार मेस्सी खेळत होता, तर हुबेहूब त्याच वेळी कोल्हापूरच्या मैदानांवरही येथील स्थानिक ‘मेस्सी’ आपल्या खेळाची जादू दाखवत होते. हा योगायोग कोल्हापूरच्या अफाट फुटबॉल प्रेमाची साक्ष देणारा आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

खेळावर अफाट प्रेम

कोल्हापुरातील क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकीच्या अफाट प्रेमाचा त्यांनी सविस्तर गौरव केला. तसेच, महाराष्ट्राची पंढरी मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरी कुस्तीचा आणि मल्लांच्या परंपरेचा सन्मान करत या मातीने देशाला आणि जगाला महान मल्ल दिल्याचे आवर्जून सांगितले.

नामवंतांची मांदियाळी

​केवळ खेळाच नव्हे, तर कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक आणि कलात्मक वारशावरही त्यांनी प्रकाश टाकला. कोल्हापूरच्या ऐतिहासिक गायन परंपरेचा गौरव करताना संगीत सृष्टीतील योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. तसेच चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील संगीतसूर्य केशवराव भोसले, बाबुराव पेंटर, भालजी पेंढारकर, पंडित विष्णू दिगंबर पलूसकर, सुधीर फडके, वामनराव सडोलीकर, शाहीर पिराजी सरनाईक, अरुण सरनाईक, रमेश देव, ऑस्कर विजेत्या वेशभूषाकार भानू अथय्या आदी नामवंत मान्यवरांचा नामोल्लेख करत कोल्हापूर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. मुख्यमंत्र्यांच्या या सर्वसमावेशक आणि जिव्हाळ्याच्या भाषणामुळे कोल्हापूरकरांच्या सांस्कृतिक अस्मितेला नवी ऊर्जा मिळाली.