कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोल्हापूर येथे बोलताना भाषणाच्या सुरुवातीला अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख माझे मित्र व लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला. एका अर्थाने शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कार्याला प्रशस्तीपत्रकच दिले. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील घनिष्ठ राजकीय संबंधाची चर्चा होत आहे.
अमित शहा हे गेल्या १२ वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शक आणि रणनीतीकार राहिले आहेत. २०१३-२०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपचा चेहरा म्हणून फडणवीस यांचा उदय झाल्यापासून, राज्यातील गुंतागुंतीच्या युती-राजकारणातून मार्ग काढण्यासाठी आवश्यक असलेला केंद्रीय पातळीवरील राजकीय पाठिंबा शहा यांनी त्यांना दिला असल्याची चर्चा आहे.
गृहमंत्री म्हणून शहा यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षा, प्रशासकीय कामकाज आणि केंद्र-राज्य समन्वयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर फडणवीस यांच्याशी नियमितपणे चर्चा केली आहे. राजकीय फेररचना किंवा युतीविषयक वाटाघाटींच्या काळात होणाऱ्या त्यांच्या मध्ये ‘बंद दाराआड’च्या बैठका याची राज्याच्या राजकारणात विशेष दखल घेतली जाते.
महाराष्ट्रातील युतीतील भागीदारांमधील बदल हाताळणे, पक्षांतर्गत असंतोष दूर करणे, राज्याच्या विधिमंडळातील प्राधान्यक्रम निश्चित करणे आदी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस हे पक्षाच्या ‘हायकमांड’शी (उच्च नेतृत्वाशी) पूर्ण ताळमेळ राखून काम करीत असताना यामध्ये अमित शहा यांनी मुख्य समन्वयक म्हणून भूमिका बजावल्याचे आजवर दिसून आले आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसरा कार्यकाळ भूषवत आहेत त्यांचे प्रभावी नेतृत्व, राज्याच्या गुंतागुंतीच्या बहु-पक्षीय राजकीय वातावरणाचे व्यवस्थापन करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर अमित शहा यांच्यासह केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास असल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याच घनिष्ठ राजकीय संबंधाची आज पुन्हा एकदा कोल्हापुरातील जाहीर सभेत प्रचिती आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख माझे मित्र व लोकप्रिय मुख्यमंत्री असा केल्याने त्याची चर्चा होत आहे.
शिंदेचाही गौरव
दरम्यान, याच कार्यक्रमात अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे वळत यापूर्वी शिंदे यांच्या नावा आधी शिवसेना शिंदे गट असा उल्लेख करावा लागत होता. पण आता अन्य कोणता गट उरलेला नाही तर शिंदे यांची एकच शिवसेना झाली आहे, असा उल्लेख त्यांनी हसत हसत केला. शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे त्यांनी एकप्रकारे कौतुक केल्याचे दिसून आले.
