सांगली : सांगलीचे महापौर म्हणून भाजपचे धीरज सुर्यवंशी व उपमहापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे गजानन मगदूम यांची आज अविरोध निवड करण्यात आली. विरोधी पक्षाकडून उमेदवारी अर्जच दाखन न झाल्याने या निवडी अविरोध करण्यात आल्या.
महापौर व उपमहापौर निवडीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक पार पडली. महापौर व उपमहापौर पदासाठी केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल असल्याने केवळ निवडीची औपचारिकताच आजच्या बैठकीत पूर्ण करण्यात आली. निवडीनंतर आयुक्त सत्यम गांधी, विशेष बैठकीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे यांनी महापौर सुर्यवंशी व उपमहापौर नरवाडे यांचे अभिनंदन करून सत्कार केला.
निवडीनंतर माध्यमांशी बोलताना महापौर सुर्यवंशी म्हणाले, सर्वांना सोबत घेउन आपण कार्य करणार असून शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी शासनाकडून मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. सांगलीसह मिरज व कुपवाड या तीनही शहरांचा समतोल विकास साधावा यासाठी सदस्यांच्या सूचनांचा आदर केला जाईल.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, सुरेश आवटी, दिनकर पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी खासदार संजयकाका पाटील यांनी महापौर व उपमहापौर यांचे महापालिकेत येउन अभिनंदन केले. निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्याची आताषबाजी करत गुलाल उधळत महापालिकेपासून गणपती पेठ मार्गे पटेल चौकापर्यंत महापौरांची जीपमधून मिरवणुक काढण्यात आली. तसेच उपमहापौर श्री. मगदूम यांची कुपवाडमध्ये मिरवणुक काढण्यात आली.
