सांगली : सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सुर्यवंशी व उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गजानन मगदूम यांची निवड बुधवारी निश्चित झाली. महापौर व उपमहापौर पदासाठी विरोधकाकडून उमेदवारी अर्जच दाखल झाले नसल्याने निवडीची औपचारिकता उरली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सकाळी महापौर पदासाठी सुर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी मगदूम यांच्या नावाची घोषणा केली. तत्पुर्वी मिरजेतील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री पाटील यांनी संघटन मंत्री मकरंद देशपांडे, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्याकर जगदाळे व गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याशी चर्चा करून या नावाला अंतिम स्वरूप दिले.
पत्रकार बैठकीत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, महापालिकेत आमचे संख्याबळ ३९ असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 16 सदस्य आमच्यासोबत आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे दोन सदस्य आमच्यासोबत येणार असून त्यांच्याशी चर्चा सुरू असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही तीन सदस्य आमच्यासोबत येतील. याामुळे महापालिकेत आमचे संख्याबळ ६० वर पोहचेल. स्थायी समिती सदस्य व स्वीकृत सदस्य निवडीबाबत नंतर विचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसने महापौर उपमहापौर निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राजेश नाईक यांनी सांगितले. संख्याबळाचे गणित जमत नसल्याने या निवडीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक संजय मेढे म्हणाले, काँग्रेस गट नेता निवड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर करण्यात येणार आहे. सध्या काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील हे निवडणूक प्रचारात गुंतले असल्याने गटनेता निवड लांबणीवर टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत सत्ता महायुतीचीच – मंत्री पाटील
जिल्हा परिषदेची निवडणूक सध्या सुरू असून या वेळी भाजप ५० जागा लढवत असला तरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महायुतीचेच असतील असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला. सर्व्हेनुसार भाजपला ३२ जागा तर पोलीसांच्या अहवालानुसार ३४ जागा मिळतील असा अंदाज आहे. चार जागा काठावर असून त्या जर विजयी झाल्या तर भाजपला या निवडणुकीत ३६ ते ३८ जागा मिळतील असेही मंत्री पाटील यावेळी म्हणाले. गेल्या निवडणुकीत भाजपला २७ जागा मिळाल्या होत्या. यावेळी या जागामध्ये वृध्दी होईल असेही ते म्हणाले.

