दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात भोंगे, हनुमान चालीसा गाजत असताना कोल्हापूरच्या कागल तालुक्यात रामनवमीवरून तालुक्यातील दोन प्रमुख नेत्यांत वाद सुरू झाला आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस रामनवमी दिवशी झाला की नाही यावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह राजे घाटगे यांनी आक्षेप घेतला आहे. तर मुश्रीफ यांनी घाटगे असत्य बोलत असल्याचे म्हटले आहे. प्रतिस्पर्ध्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी हजारो कार्यकर्ते घेऊन पोलीस ठाण्यावर मोर्चे काढले जात असल्याने राजकारण ढवळून निघाले आहे. कागल तालुक्याचे राजकारण सातत्याने धगधगते राहिले आहे. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासमवेत राजकारण केल्यानंतर पुढे मुश्रीफ यांनी स्वतंत्रपणे राजकारण सुरू केले. तेव्हा मंडलिक-मुश्रीफ यांच्यातील वाद दोन दशकांहून अधिक काळ तापत राहिला. पुढे मंडलिक-मुश्रीफ कुटुंबात समेट घडला. शिवसेनेचे खासदार संजय सदाशिवराव मंडलिक यांच्या विजयात मुश्रीफ यांचा अप्रत्यक्षरीत्या हात राहिला होता. वादाचे एक पर्व संपले आणि गेल्या दशकापासून मुश्रीफ-घाटगे या नव्या वादाने उचल खाल्ली आहे.

संघर्षांची वळणे

वास्तविक मुश्रीफ यांच्या राजकारणाची सुरुवात छत्रपती शाहू स. सा. कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली झाली. पुढे मुश्रीफ हे मंडलिक गटाशी जोडले गेले. नंतर मुश्रीफ जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आल्यावर समरजित घाटगे यांनी त्यांच्यासमवेत राजकीय प्रवास सुरू केला. अलीकडे मुश्रीफ, संजय मंडलिक आणि शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे या त्रयीची राजकारणात गट्टी जमली आहे. अशा स्थितीत तालुक्यातील विरोधकांची पोकळी भरून काढण्यासाठी पुढे आलेल्या घाटगे यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे म्हाडाचे अध्यक्षपद दिले. दोन वेळा कागलमध्ये जाऊन घाटगे यांची विधानसभेची निवडणूक सोपी होण्यासाठी बळ पुरवले. विधानसभा निवडणूक मुश्रीफ-घाटगे अशी अपेक्षित असताना पडद्यामागून सूत्रे फिरली आणि संजय घाटगे रिंगणात आले. विरोधी गटांची गटात फूट होऊन मुश्रीफ पाचव्यांदा आमदार बनले. पाठोपाठ ग्रामविकास आणि अलीकडे कामगार असे महत्त्वाचे मंत्रिपद मिळाल्याने तालुक्यात मोठा निधी आणला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे या खासगी साखर कारखाना उत्तम चालवून तालुक्यात मतांची साखरपेरणीही केली आहे.

कायदा सुव्यवस्थेला आव्हान

घाटगे यांनी यापूर्वी रामनवमीच्या वाढदिवसाला आक्षेप घेतला नव्हता. मात्र तो आत्ताच का घेतला आहे. घाटगे यांनी राम नाम जपत आतापासूनच आगामी राजकारणासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी ‘मुश्रीफ यांचा वाढदिवस रामनवमी नाही तर रंगपंचमी दिवशी आहे. राम नामाचा ते अवमान करीत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,’ या मागणीच्या त्यांच्या मोर्चाने कागल पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घाटगे यांच्या कार्याचा आवाका माहीत असल्याने मुश्रीफ यांनीही राजर्षी शाहूंचे जनक घराण्याचे वंशज खोटे बोलत असल्याचे नमूद करीत जशास तशी चाल केली. मुश्रीफ समर्थकांनी सोमवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ‘धादांत खोटी विधाने करणारे घाटगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा’ अशी मागणी केली आहे.

हिंदूत्वाची पेरणी

कोल्हापूर पोटनिवडणुकीत हिंदूत्वाच्या भूमिकेवरून भाजपच्या मतांच्या पेटीत दुप्पट भर पडली आहे. ही बाब घाटगे यांनी हेरली असून रामनवमीच्या मुद्दय़ावरून मुश्रीफ यांच्यावर शरसंधान करीत विधानसभेच्या तयारीला हात घातला आहे. हिंदूत्वाचा मुद्दा अडसर ठरू नये याची खबरदारी मुश्रीफ यांनी आधीच घेतली आहे. कागलमधील राम मंदिर उभारणीपासून तालुक्यात सुमारे दोन डझन भव्य देवळांच्या निर्मितीसाठी मदत करून ‘मंदिरवाले बाबा’ अशी प्रतिमा निर्माण केली गेली आहे. कडवट हिंदूत्वाचा मुद्दा पुढे आला तरी त्याला शह कसा द्यायचा याचे नियोजनही मुश्रीफ यांनी केल्याचे दिसते.

तालुक्यात त्रयी एकत्र

रामनवमीवरून खडाजंगी सुरू असताना तालुक्यातील अन्य प्रमुख नेत्यांनी मुश्रीफ यांना पाठबळ दिले आहे. खासदार संजय मंडलिक यांनी ‘रामनवमी दिवशी जन्माला आला की नाही हा वाद करण्यात अर्थ नाही. कोण कधी जन्माला आला यापेक्षा काय केले याचे मूल्यमापन गरजेचे आहे. तालुक्यात जातीयवादी विचार वाढू नये यासाठी मंडलिक, मुश्रीफ, संजय घाटगे एकत्र राहणार आहोत,’ असे त्यांनी तिघांच्या साक्षीने कालच सांगितले आहे.