पूरग्रस्तांच्या मदतीवरून वाद

कोल्हापूरमध्ये सत्तारूढ आघाडी-भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापुरात महामोर्चा काढला होता.

कोल्हापूरमध्ये सत्तारूढ आघाडी-भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप

दयानंद लिपारे, लोकसत्ता
कोल्हापूर :  पूरग्रस्तांच्या मदत वाटपावरून राजकारण तापत चालले आहे. पूरग्रस्त नागरिक, शेतकरी, व्यावसायिक यांना मिळणाऱ्या मदतीच्या मुद्दय़ाने महाविकास आघाडी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. २०१९ साली केलेल्या महापुराच्या तुलनेने आघाडीची मदत तुटपुंजी असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राज्य शासनाने घोषित केलेल्या मदतीपेक्षा प्रत्यक्षात मिळणारी मदत अत्यल्प असल्याचा टोला राजू शेट्टींना लागला आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यंदाची मदत ही गतवेळेपेक्षा अधिक असल्याचा दावा केला आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्य़ाला महापुराचा तीन वेळा मोठा तडाखा बसला आहे. २००५, नंतर २०१९ मध्ये मोठा महापूर आला होता. जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ात पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीसारख्या पावसामुळे तीनच दिवसांत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांचा मोठा भाग जलमय झाला होता. घरे, शेती, दुकाने, पशुधन यांचे अतोनात नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना मदत करण्याची भूमिका असली तरी ती मागील महापुराच्या तुलनेत किती कमी-अधिक आहे यावरून जुगलबंदी सुरू आहे.

सरकारकडून मदतीचा दावा

दरम्यान, महाविकास आघाडीकडून मात्र पूरग्रस्तांना भरीव मदत केली जात असल्याचे सांगितले जात आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज त्यांनी सांगितले की, बहुतेक तालुक्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तातडीची सानुग्रह अनुदानाच्या १७ कोटींचे मदत वाटप सुरू झाले असून तितकीच रक्कम आणखी दिली जाणार आहे. छोटय़ा दुकानदारांना ५० हजार रुपये मदत केली आहे. घरांची पडझड झाल्यानंतर मागील सरकारने ९५ हजार रुपये दिले होते. आम्ही त्यामध्ये वाढ करून ही रक्कम दीड लाख रुपये केली आहे. शेतीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही पुरेशी मदत केली जाणार आहे. उलट सामायिक शेती असेल तर ती कसणाऱ्या सर्व भावांना नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. भाजपकडून होणारी टीका ही माहिती न घेता केली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीबाबत राज्य शासनाचे या आठवडय़ामध्ये परिपत्रक जाहीर होईल. ते उपलब्ध झाले की महा विकास आघाडीची मदत आणि पूर्वीच्या काळातील सरकारची मदत याचे तुलनात्मक सादरीकरण करणार आहे. त्यातून ठाकरे व फडणवीस सरकारच्या काळात कोणाला अधिक मदत मिळाली याचा लेखाजोखा जाहीर करणार आहे,’ असे आव्हान त्यांनी दिले आहे.

राजू शेट्टी यांची टीका

सन २०१९ मध्ये भाजप सरकारने पूरग्रस्तांना न्याय दिला असल्याचा दावा भाजप करीत आहे. तेव्हा नुकसानीच्या प्रत्येक बाबींची नोंद घेत मदत केली. पावणेचार लाख शेतकऱ्यांना पंधरवडाभर सुरक्षित ठिकाणी हलवले होते. त्यांना रोज ६० रुपयेप्रमाणे निर्वाहभत्ता तर जनावरांना चाऱ्यासाठी ७० रुपये दररोज दिले जात होते. याशिवाय तातडीची सानुग्रह मदत म्हणून १५ हजार रुपये देण्यात आले. घर अर्धवट पडले असेल तर ९५ हजार रुपये आणि पूर्ण पडले असेल तर अडीच लाख रुपये दिले. घर बांधण्यास कालावधी लागणार हे ओळखून शहरात दरमहा तीन हजार रुपये तर ग्रामीण भागात दोन हजार रुपये घरभाडे देण्यात आले. जिल्हा बँकेच्या व्याज दरानुसार अडीच हेक्टपर्यंत संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यात आले. पीक कर्ज न घेणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांना २० हजार ४००, तर बागायतदार शेतकऱ्यांना ५४ हजार रुपये नुकसानभरपाई दिली. दुकानदारांना ५० हजार रुपये तातडीची मदत दिली, असे भाजपने समाजमाध्यमातून व्यक्त होत आमची मदत अधिक कशी होती याचा प्रसार चालवला आहे. ‘विद्यमान ठाकरे सरकारने आमच्या शासन निर्णयातील चार-पाच बाबी उचलल्या असून उर्वरित २० मदतीच्या बाबींकडे दुर्लक्ष केले आहे,’ असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. निर्वाह भत्ता दिलेला नाही. मदत करू असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात तोकडी मदत केली आहे. आघाडीची मदत अकराशे हजार कोटींच्या पुढे जाणार नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही आघाडीच्या मदतीवर सोमवारी महामोर्चामधून नाराजी व्यक्त केली आहे. १५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ७०० कोटी रुपयेसुद्धा शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशी शंका उपस्थित करीत त्यांनी उशिराने मिळत असलेल्या मदतीबद्दल टीका केली आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Disputes in bjp maha vikas aghadi over flood relief zws

Next Story
तीन लाखाची लाच घेताना एकाच रंगेहात पकडले; कोल्हापुरात कारवाई
ताज्या बातम्या