कोल्हापूर : आयुष्यातील असंख्य चढ-उतार अनुभवलेले डॉ. डी. वाय. पाटील यांनी जीवनामध्ये अभियंता होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण कष्टप्रद आयुष्यामुळे, घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. पण त्यांच्यातील शिक्षण आणि शिक्षण विषयक उमेद इतकी प्रभावी होती की त्यांनी आयुष्यात पुढे शिक्षण क्षेत्रालाच वाहून घेतले. त्यांनी एकाहून एक उत्तम शिक्षण संस्था, विद्यापीठे, शाळा -महाविद्यालय सुरू केली. त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही गौरव होत राहिला. शिक्षण हेच त्यांच्या जीवनाचे अविभाज्य कार्यक्षेत्र बनले. शिक्षण क्षेत्रात शिक्षण महर्षी, शिक्षण सम्राट अशा नावाने त्यांचा बोलबाला होत राहिला.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात अतिशय महत्त्वाचे योगदान दिले. राज्याबरोबरच देशाच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांनी अत्यंत ध्येयनिष्ठपणे काम करीत असताना व्यावसायिक शिक्षणाचा विकास व विस्तार यांसाठी त्यांनी अव्याहत परिश्रम घेतले. त्यांच्या या परिश्रमातूनच डी.वाय. पाटील समूहाचा शैक्षणिक वृक्ष विस्तारला. व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवाहात सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांचे समावेशन डॉ. पाटील यांच्यामुळे शक्य झाले.
असा रचला पाया
शेती सांभाळतच त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. ग्रुपचे पहिले डी. वाय. पाटील इंजिनियरींग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज कोल्हापुरातील कसबा बावड्यात स्थापन झाले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पहिले प्रायव्हेट मेडिकल कॉलेज १९८९ला सुरू झाले. डॉ. डी. वाय. पाटील यांचेज्येष्ठ सुपुत्र डॉ. संजय डी.पाटील यांनी तळसंदे येथील १४८ शेतकऱ्यांनी एकत्रित केले. तसेच २०५ एकर जमीन १९८८-८९ला खरेदी केली. सुरवातीला या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती. जेसीबीच्या साह्यानेया परिसरातील मोठ-मोठेदगड बाजूला करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करुन हा परिसर हिरवागार करण्यात आला. त्यासाठी टँकर व बैलगाडीने पाणी आणण्यात आले. फळपिकांच्या लागवडीसाठी या मूरमाड जमिनीवर नदीकाठची माती आणून टाकण्यात आली. येथे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले कृषी विज्ञान केंद्र साकारण्यात आले.
कृषी शिक्षणाचा वटवृक्ष
शिक्षण क्षेत्राबरोबरच शेती डॉ. पाटील यांचा अत्यंत आवडीचा अन जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी तळसंदे परिसर हिरव्यागार नंदनवनात रुपांतरीत केला आहे. या ठिकाणी स्वत: लक्ष घालून विविध झाडे, भाजीपाला यांचे प्रयोग करून आज तेथे मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्त्पन्न घेतले जाते. पाटील यांचा परीसस्पर्शानेहा परिसर कृषीक्षेत्र व शिक्षण केंद बनला आहे. या ठिकाणी आज तीस प्रकारचा भाजीपाला व विविध वीस प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले जाते. यात काही विदेशी जातींचाही समावेश आहे. या ठिकाणी साडेचार हजारांहून अधिक नारळाची झाडे आहेत. येथील काही क्षेत्रावर सेंद्रिय शेतीही केली जाते. कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करण्यावर व वेगवेगळी पिके घेण्यावर डॉ. पाटील यांचा नेहमीच भर असतो. त्यांच्या या कार्याची दखला घेत अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेआहे.
आजघडीला तळसंदे येथे तीन ॲग्रीकल्चर कॉलेज, प्रत्येकी एक इंजिनियरींग, पॉलिटेक्निक, आर्किटेक्चर कॉलेज आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पहिले ॲग्रीकल्चर ॲंड टेक्निकल विद्यापीठ सुरू झाले. डी. वाय. पाटील विद्यापीठाला २००५ला केंद्र शासनानेअभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. पुण्यातील आकुर्डी येथे शिक्षणाचा विस्तार झाला. पुण्यात चौदा महाविद्यालयेसुरू झाली. आकुर्डीच्या सेंटरमध्ये १६ हजार विद्यार्थी आहेत. कोल्हापूर शहरात साळोखेनगरात इंजिनियरींग कॉलेज, शांतिनिकेतन स्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेज, गारगोटी येथेआयटीआयसह कनिष्ठ महाविद्यालय, कदमवाडीत डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज सुरू केले. अभिमत विद्यापीठांतर्गत नर्सिंग, फिजिओथेरपी व हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सुरू केले.
शिक्षण क्षेत्राचा विस्तार
ग्रुपच्या शैक्षणिक संस्थांतून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून, जगाच्या कानाकोपऱ्यात तेकाम करत आहेत. ग्रुपच्या शाळांत दोन हजार शिक्षक, तर अडीच हजार शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत. दोन विद्यापीठे व तीसहून अधिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा महायज्ञ सुरु आहे. डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेत्रुत्वखली या ग्रुपने शिक्षणाबरोबरच आरोग्य, क्रीडा, कृषी, करमणूक, रिटेल, हॉटेल आदी विविध क्षेत्रांतही विस्तार केला आहे.
कार्याचा सन्मान
त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने त्यांना सन २०१५ मध्ये डी.लिट. ही सर्वोच्च पदवी देऊन गौरविले होते. त्याचप्रमाणे सन २०२२ मध्ये विद्यापीठाचा प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कारही प्रदान केला. या पुरस्काराच्या रकमेच स्वतःकडील दहा लाख रुपयांच्या निधीची भर घालून संत साहित्याच्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार योजना सुरू करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार विद्यापीठाने ‘पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील पुरस्कार’ प्रदान करण्यास सुरवात केली. डॉ. पाटील यांचा शिवाजी विद्यापीठ परिवाराशी प्रगाढ स्नेह होता. हा स्नेहभाव अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिला.
